अपघातात उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांसह तीन जखमी

0
11

भंडारा,दि.12 : दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात जिल्हा परिषदेच्या बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तिघे जखमी झाले. मनिषा नारायण कुरसुंगे असे जखमी अधिकाऱ्यांचे नाव आहे. ही घटना गुरूवारी सकाळी ११.३० च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील महादुला फाट्यावर घडली.
या अपघातात महिला व बाल कल्याण विभागाचे कनिष्ठ लिपीक युवराज पोवळे, वाहनचालक राजेश विठ्ठल शेल्लारे (४४) यांचा समावेश आहे. माहितीनुसार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे या शासकीय कामानिमित्त नागपूर येथे (एमएच ३२ एएच ७१०) या वाहनाने जात होत्या. त्यांच्यासोबत लिपीक पोवळे हे होते. दरम्यान महादुला फाट्यावर एका दुचाकीचालकाने अचानक वाहन वळविल्यामुळे त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. यात कार दुभाजकावर आदळून उलटली. यात मनिषा कुरसुंगे यांच्या पायाला व तोंडाला दुखापत झाली. शेलारे व पोवळे यांच्या पायाला व तोंडाला दुखापत झाली. त्यानंतर लोकांनी धाव घेत तिघांनाही वाहनातून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर खाजगी वाहनाने तिघांनाही जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.