बिबट्याशी झुंज, शेतकरी बचावले

0
5

नागपूर,दि.15 : बिबट्याच्या जबड्यात ‘त्याचा’ एक हात फसलेला, रक्तबंबाळ झालेला…, तर ‘त्याने’ दुस-या हाताने बिबट्याची नरडी करकचून पकडलेली…, कधी बिबट त्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी चवताळलेला…, तर कधी ‘तो’ जीव वाचविण्याच्या आकांताने आपल्या पंजाने संपूर्ण ताकदीनिशी स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपडणारा…, अशातच त्याचा चुलतभाऊ मदतीला धावला. त्याने कु-हाडीने त्या बिबट्यावर वार केले अन् अंगाचा थरकाप उडविणा-या या अर्ध्या तासाच्या झुंजीत बिबट ठार झाला. चित्रपटात बघायला मिळणारे हे दृश्य  उमरेड तालुक्यातील  लोहारा शिवारात रविवारला अनुभवयास मिळाले आहे.

लोहारा हे गाव उमरेड शहरापासून १२ किमी अंतरावर असून, संपूर्ण शिवार जंगलाने वेढलेला आहे. वनविभागाच्या संरक्षित परिसरातील लोहारा (पांढर) तलावालगत असलेल्या रवींद्र ठाकरे (रा. लोहारा, ता. उमरेड) यांच्या शेतात हा थरार रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडला. यात रवींद्र भाऊराव ठाकरे (४५, रा. लोहारा, ता. उमरेड) व त्यांचा चुलतभाऊ राजेंद्र देवराव ठाकरे (रा. खुर्सापार, ता. उमरेड) या दोन शेतक-यांनी बिबट्याशी दोन हात करीत स्वत:चा जीव वाचविला. जीव वाचविण्याच्या या झटापटीत बिबट मात्र ठार झाला. यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.