अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

0
8

साकोली,दि.15ः-भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना साकोली येथील राष्ट्रीय महामार्गावरील विरसी फाट्याजवळ रविवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली. साकोली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुला दाट जंगल असून नागझिरा व्याघ्र प्रकल्प व नवेगाव बांध अभयारण्य आहे. या परिसरात मोठय़ा प्रमाणात वन्यप्राण्यांचे अधिवास असल्याने नेहमीच वन्यप्राणी राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतात. या मार्गावरून सुसाट वेगात वाहने धावत असल्यामुळे अनेकदा वन्यप्राण्यांचा बळी गेला आहे. रविवारी पहाटे विरसी फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर एक बिबट मृतावस्थेत पडून असल्याची माहिती साकोली वन विभागाला प्राप्त झाली. माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक प्रितमसिंग कोडापे, वनपरिक्षेत्र अधिकारी आरती उके, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी धोटे, वनरक्षक घुगे, भुसारी, भोगे, कोरे, लांजेवार, वघारे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तपासणी दरम्यान, भरधाव वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी वाघाये यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर विरसी रोपवाटीकेत त्याला जाळण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.