कृषी विभागाला पडला बैलबंडी वाटपाचा विसर दोषींवर कारवाईची मागणी

0
11
गोंदिया,दि.19 : जिल्हा परिषद कृषी विभागअंतर्गत जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या कृषी विभागाला सन २०१५-१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/जमातीच्या शेतकर्‍यांना वाटपासाठी बैलबंडी देण्यात आले. परंतु, गोंदिया, आमगाव, सालेकसा व इतर ठिकाणच्या पंचायत समितीच्या कृषी विभागाने या बैलबंडीचे शेतकर्‍यांना वाटप केले नसल्याची बाब समोर आली असून, कृषी विभागच शेतकर्‍यांसाठी येणार्‍या साहित्याची विल्हेवाट लावत असल्याचा आरोप जि.प. सभापती छायाताई दसरे यांनी केला आहे.
अनुसूचित जाती/जमातीअंतर्गत येणार्‍या शेतकर्‍यांना अनुदानावर कृषी विभागामार्फत कृषी विषयक अनेक साहित्यांचे वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी व त्यांच्या अधिनस्त असलेल्या कृषी विस्तार अधिकार्‍यांमार्फत जिल्ह्यातील पंचायत समितीच्या कृषी विभागाला लाभार्थ्यांच्या संख्येनुसार साहित्य वाटप करण्यासाठी पुरवठा करतो. त्याच अंतर्गत सन २०१५-१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत या घटकातील शेतकर्‍यांना अनुदानावर वाटपासाठी बैलबंडी पाठविण्यात आल्या. मात्र, गोंदिया, सालेकसा, आमगाव या पंचायत समितींच्या कृषी विभागामार्फत लाभार्थ्यांना अद्यापही बैलबंडीचे वाटप करण्यात आलेले नाही. ह्या बैलबंडी समितीच्या गोडावूनमध्ये धुळखात पउल्याचे चित्र गोंदिया येथे दिसून आले. हीच परिस्थिती इतर तालुक्यातील पंचायत समितीच्या कृषी विभागाअंतर्गत असल्याची माहिती प्राप्त आहे.
एकंदरीत या प्रकाराला जिल्हा कृषी अधिकारी त्यांच्या अधिनस्त कृषी विस्तार अधिकारी व तालुक्याचे कृषी अधिकारी जबाबदार असून, शेतकर्‍यांना लाभापासून वंचित ठेवण्याचेच काम हे विभाग करत असल्याने संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जि.प. सभापती छायाताई दसरे यांनी केली आहे. तेव्हा, जिल्हा प्रशासन व संबंधित विभाग काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.