नवनियुक्त अध्यक्षांची स्थायी समितीच्या बैठकीला दांडी

0
7
गोंदिया,दि.२३-गोंदिया जिल्हा परिषदेच्या आज मंगळवारला होऊ घातलेल्या स्थायी समितीच्या बैठकीला समितीच्या अध्यक्षा व जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी यांनी कुणाला काहीच न सांगता दांडी मारल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.२३ जानेवारीला स्थायी समितीची सभा होणार असल्याचे पत्र ११ जानेवारीच्या तारखेत सदस्य सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या स्वाक्षरीने काढण्यात आले.ते पत्र स्थायी समितीच्या सदस्यांना २२ जानेवारीला सायकांळी ५ वाजेच्या सुमारास मिळाले.त्यानुसार स्थायी समितीचे सदस्य गंगाधर परशुरामकर,सुरेश हर्षे,रजनी कुंभरे,राजलक्ष्मी तुरकर आदी सदस्य उपस्थित झाले.त्यासोबतच ८ ही तालुक्यातील गटविकास अधिकारी,उपविभागीय अभियंता व सर्व विभागप्रमुखही हजर झाले.परंतु ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घ्यायची होती त्या जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी यांचाच कुठे पत्ता नव्हता.विशेष म्हणजे अध्यक्षांच्या कार्यालयातही अध्यक्ष मॅडम कुठे आहेत याची कल्पनाच नव्हती अशी माहिती जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी देत अध्यक्ष श्रीमती मडावी यांनी बैठकीला अनुपस्थित राहायचे होते तर तसे आधी कळवायला हवे होते असे सांगत बहुधा पहिल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांना समाधानकारक उत्तर देण्याची तयारी त्यांची झाली नसावी म्हणूनच त्या गैरहजर राहिल्याचे म्हणाले.अध्यक्षासंह इतर सभापती सुध्दा बैठकिला गैरहजर राहिल्याने अखेर सदस्य सचिवांनी सभाच तहकुब केली.
चाहूल सभापती निवडणुकीची
जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपासोबत युती करुन जि.प मधील सत्ता कायम ठेवली.आता ३० जानेवारीला विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत हेच समीकरण कायम राहणार असून जुना फार्मुलानुसार दोन काँग्रेस व दोन भाजपाकडे सभापतीपद राहणार आहे.महिला व बालकल्याण, समाज कल्याण, कृषी व शिक्षण सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे.काँग्रेसकडून सभापतीपदासाठी रमेश अंबुले,गिरिष पालीवाल,शेखर पटले,लता दोनोडे, सरिता कापगते तर भाजपकडून विश्वजीत डोंगरे,शोभेलाल कटरे रजनी कुंभरे, तेजुकला गहाणे यांची नावे सध्या चर्चेत आहे.काँग्रेसचे सदस्य हे मुंबईला आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सहलीला रवाना झाले आहेत.भाजपचे सदस्य अद्याप निघालेले नसून ते २६ जानेवारीनंतर जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे सदस्य यावेळी कुठेच जाण्याच्या तयारीत नाहीत.