भाजपाही लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवेल- आशिष शेलार

0
10

मुंबई,दि.23(विशेष प्रतिनिधी) –  2019च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीने या ठरावाला मंजुरी दिल्यानंतर भाजपानं शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजपाही स्वबळावर लढवण्यात तयार असल्याचे सूतोवाच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी केले आहे.
ते म्हणाले, खरंतर आमची युती करण्याची भूमिका होती. पण शिवसेना स्वबळाची भाषा करत असल्यास 2019च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकाही भाजपा स्वबळावर लढवण्यास तयार आहे. परंतु शिवसेनेने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्यास त्यांचेच नुकसान होणार आहे, असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. याच मुद्द्यावरून भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढल्याने शिवसेनेचे नुकसानच होईल. लोकसभेला शिवसेनेचे केवळ 5 तर भाजपाचे 28 खासदार निवडून येतील, असा अंदाज भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तवला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.
काकडे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आज निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. यामुळे सेनेची वाढ होणार नसून नुकसानच होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्यास, मोठा भाऊ भाजपाच राहील. मोदींच्या करिष्म्यामुळेच शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. लोकसभा स्वतंत्र लढलो तर भाजपाचे 28 आणि शिवसेनेचे 5 खासदार निवडून येतील. शिवाय विधानसभा स्वतंत्रपणे लढल्यास भाजपाचे 165 आमदार निवडून येतील, असे भाकितही काकडेंनी वर्तवले आहे.