आ.अग्रवालांच्या पुढाकाराने गोंदियात साकारणार सिंचन भवन

0
9

गोंदिया दि.९ः-: शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात सिंचन विभागाची विविध कार्यालये आहेत. मात्र या कार्यालयांच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब लक्षात घेवून आ. गोपालदास अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्यासमोर मांडली.यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गोंदिया येथील सिंचन भवनाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे.
मागील अनेक वर्षांपासून शहरात सिव्हील लाईन्स परिसरात सिंचन विभागाच्या अभियंत्यांची कार्यालये आहेत. येथील जुन्या, जीर्ण इमारतींमुळे विभागाच्या कामकाजावर परिणाम होत होता. तर विविध ठिकाणी कार्यालये असल्याने कामाचा समन्वय साधताना अडचण निर्माण होत होती.आ. गोपालदास अग्रवाल यांनी गोंदियाच्या मध्यम प्रकल्प सिंचन विभाग, बाघ सिंचन विभाग, गोंदिया सिंचन विभाग आदी विभागांच्या कार्यालयांना हनुमान चौक, सिव्हील लाईन्स येथील सिंचन विभाग परिसरात प्रशस्त इमारतीचे बांधकाम करून एकाच ठिकाणी आणण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. यांसंदर्भात त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून याबाबत माहिती दिली.
गोंदिया जिल्ह्यात वाढत असलेल्या सिंचन योजनांना लक्षात घेवून येथे तिन्ही सिंचन विभागांच्या कार्यप्रणालीवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने अधीक्षक अभियंत्याची नियुक्ती करण्याची आणि सिंचन भवनाच्या बांधकामासाठी मंजुरी देण्याची विनंती केली होती.या संदर्भात राज्य नियामक मंडळाची ३१ जानेवारी २०१८ रोजी सिंचन मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. महाजन यांनी गोंदियात सिंचन भवनाच्या बांधकामास मंजुरी दिली.गोंदिया येथे अधीक्षक अभियंत्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सिंचनाशी संबंधित कार्यांना गती मिळेल. या समितीत सिंचन सचिव चहल, वित्त सचिव पोरवाल यांच्यासह अनेक मोठे अधिकारी सदस्य आहेत.