देव्हाडा साखर कारखान्यात २२ कोटींचे चुकारे अडले;ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत

0
32

भंडारा,दि.10ः- मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील साखर कारखाना प्रशासनाने नोव्हेंबर २0१७ पासून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना चुकारे दिलेले नाही. सुमारे १ लाख ४ हजार टन ऊसाचे २२ कोटी ८0 लाख रुपयांचे चुकारे देणे आहे. वेळेवर चुकारे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
देव्हाडा येथे मानस अँग्रो साखर कारखाना उभारण्यात आल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी पारंपारिक धान शेती सोडून ऊसाची लागवड सुरू केली आहे. त्यामुळे ऊसातून शेतकर्‍यांच्या हाती पैसा खेळू लागला. हा कारखाना तयार झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, अनियमित चुकार्‍यांमुळे शेतकरी त्रस्त आहे.
काही महिन्यांपुर्वी शेतकरी व कारखाना प्रशासन यांच्यात ऊसाला वाढीव भाव देण्याबाबत संघर्ष निर्माण झाला होता. परंतु, कारखाना प्रशासनाने २२00 रुपये भाव देऊन शेतकर्‍यांचे चुकारे १५ दिवसात देण्याचे कबूल केले होते. शेतकर्‍यांनीही हे मान्य केले होते.
या गळीत हंगामात साखर कारखान्याने १ लाख १७ हजार टन ऊस खरेदी केला. आतापर्यंत कारखान्याने फक्त १३ हजार टनाचेच पैसे शेतकर्‍यांना दिले आहे. उर्वरित १ लाख ४ हजार टन ऊसाचे पैसे शेतकर्‍यांना अद्याप मिळालेले नाही. ही रक्कम २२ कोटी ८0 लाखाच्या घरात आहे. वेळेवर चुकारे मिळत नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न या परिसरातील शेतकर्‍यांना पडला आहे.
ऊस लागवडीसाठी मोठा खर्च येत असला तरी आम्ही तो पिकवितो. परंतु, चुकारे उशिरा मिळत असल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. शेतकर्‍यांना तात्काळ चुकारे देण्याची मागणी जि.प. सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी केली आहे.