बावनथडी प्रकल्पाच्या अडचणी महिनाभरात सोडवा – पालकमंत्र्यांचे निर्देश

0
11

भंडारा,दि.19 : मोहाडी नगर पंचायतीच्या अंदाजपत्रकात पाणी टंचाईसाठी निधीची तरतूदच करण्यात आली नसून फक्त दुरुस्तीसाठीच तरतूद असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आढावा सभेत आढळून आले. तसेच महिनाभरात बावनथडी प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबतच्या अडचणी सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारला जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
तुमसर येथील बालाजी सभागृहात तुमसर उपविभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे उपस्थित होते. प्रारंभी उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिम 2017-18 यांत्रिकीकरण अंतर्गत पालकमंत्री यांचे हस्ते टॅक्टर वाटप करण्यात आले. तसेच ‘व्यथा शेतकऱ्यांच्या’ या चित्रफितीचे आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सदर चित्रफित सर्व ग्रामपंचायतीत दाखविण्यात येणार आहे.
पालकमंत्री म्हणाले की, अवैद्य दारुबंदीसाठी सर्व ग्रामपंचायतीत ग्रामरक्षक दलाचे गठन करण्यात येणार आहे. त्यामुळे अवैध दारु विक्रीस आळा बसेल. सर्व विकास कामांचा निधी 31 मार्च पर्यंत खर्च करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
पाणी टंचाईचा प्रश्न जिल्ह्यात भेडसावणार असून त्यासाठी आतापासून कार्यवाही करावी. तसेच लोकांना संभाव्य पाणी टंचाईची परिस्थिती झळ बसणार नाही या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तुमसर व मोहाडी तालुक्यातील ज्या बोअरवेल निकामी झाल्या त्या कमी कराव्यात. जलयुक्त शिवारच्या कामांची व्हिडीओग्राफीसह कार्यवाही करुन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कामाचा आढावा सादर करा. प्रत्येक कामाचे जिओ टगिंग करा, असेही ते म्हणाले. जलयुक्त शिवारच्या कामाची माहिती सर्व विभागांनी ग्रामपंचायत सरपंचास द्यावी.जलयुक्त शिवार हा मुख्यंत्र्ंयाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असल्याने या कामास प्राधान्य द्यावे व 31 मार्च पूर्वी सर्व कामे पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
बावनथडी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीची रजिस्ट्री प्रकरण मंगळवारपर्यंत निकाली काढा. तसेच महिनाभरात बावनथडी प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबतच्या अडचणी सोडविण्याचे तसेच उपविभागातील 12 अतिदुर्गम भागातील गावाची प्रकरणे शासनस्तरावर बैठक घेऊन सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावाजवळील झुडपी जंगल कमी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे आधार लिंकींगचे कामे 100 टक्के पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. आधार लिंक न झाल्यास लाभार्थ्यांना मॅन्युअल पद्धतीने धान्य वितरित करा. अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्तांचे पंचनामे करताना जनतेची त्यात स्वाक्षरी घ्या व त्याचे व्हिडीओ शुटींग करा, असे ते म्हणाले.
रब्बी पिकाच्या नियोजनाबाबत 121 गावाचा सर्वे करुन ज्या ठिकाणी पाण्याची परिस्थिती अतिशय नाजूक आहे अशा ठिकाणी उपाय योजना करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी जलसंपदा, बावनथडी प्रकल्प, चांदपूर जलाशय, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषि, वन, पाणी टंचाई, ग्रामीण विकास यंत्रणा, मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना, नगरपरिषद, लघुपाटबंधारे, झुडपी जंगल, अन्न सुरक्षा योजना, उज्ज्वला योजना, महाकर्जमाफी योजना, अवकाळी पाऊस व गारपीट, पिक विमा योजना, भूसंपादन, अतिक्रमण, अवैध दारु विक्री आदी विषयाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.