शिवाजींची आज्ञापत्रे आजही मार्गदर्शक -डॉ अभिमन्यू काळे

0
10

देवरी येथे शिवजयंतीचे आयोजन

देवरी, दि.19- आग्र्यावरून शिवाजी महाराजांची झालेली सुटका हे आजही एक कोडे आहे. अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये महाराजांनी सुराज्याची स्थापना केली. अगदी कमी वयात महाराजांनी अनेक असाध्य असे यश संपादन केले. महाराजांचे आपल्या रयतेवर जीवापाड प्रेम होते. आपली रयत कशी सुखी व समाधानी असेल, याचा त्यांना कायम ध्यास होता.महाराजांनी राज्य चालविण्यासाठी आदर्श अशी आज्ञापत्रे तयार केली होती. ती आज्ञापत्रे जनतेला सुखी ठेवण्यासाठी राज्यकर्त्यांना उत्तम मार्गदर्शक ठरू शकतात, असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी आज (दि.19) देवरी येथे केले.
ते देवरी येथे शिवाजी संकुलात आयोजित शिवजयंतीच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर,आमदार संजय पुराम, माजी आमदार हेमंत पटले, भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, नगराध्यक्ष सुमन बिसेन, सुनंदा बहेकार, प्रमोद संगीडवार, प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुमंत टेकाडे,देवरीचे तहसीलदार विजय बोरूडे,  मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे,  आदिवासी डेव्हलपमेंट इनिशिएटिवचे अध्यक्ष जयंत कोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी चिखलखुंदे, सविता पुराम, जयंत कोटे यांचेसह पाणी फाउंडेशन आणि नवयुवक किसान गणेशोत्सव मंडळाचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री येरणे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी सरकारवर हल्ला चढवित शैक्षणिक शुल्क वेळेवर न देऊन शासन शैक्षणिक संस्थाचे कंबरडे मोडत असल्याचा आरोप केला.
कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षक एस.टी. मेश्राम यांनी केले.