सरपंच व महिला सदस्यांना मारहाण

0
15

गराडा येथील ग्रामसभेत असामाजिकतत्त्वांचा धुमाकुळ
तिरोडा पोलिसात तक्रार दाखल

तिरोडा (गोंदिया) दि.२२ः-: तालुक्यातील गराडा येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामरोजगार सेवकाचे पद रिक्त असल्याने हे पद भरण्याकरिता ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. या ग्रामसभेत गावातील काही असामाजिक तत्त्वांनी धुमाकूळ घालून महिला सदस्य व सपंचांना मारहाण केल्याची घटना बुधवार, २१ फेब्रुवारीला घडली. याबाबद महिला सदस्यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
चार महिन्यापूर्वी तिरोडा तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गराडा येथील ग्रामरोजगार सेवक जगदेव आमकर यांनी ग्रामरोजगार सेवकाचा राजीनामा देऊन सरपंचपदाची निवडणूक लढवून त्यात ते विजयी झाल्याने गराडा येथील ग्रामरोजगार सेवकाचे पद रिक्त झाले. या रिक्तपदाकरिता आज, २१ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेची रितसर सुचना तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन तिरोडा व सर्व संबंधितांना देण्यात आली होती. बुधवारला सरपंच जगदेव आमकर यांच्या अध्यक्षतेत ग्रामसभेला सुरुवात झाली असता या सभेत गटसचिव गुलाब लिल्हारे, पं.स. विस्तार अधिकारी बन्सोड यांच्या उपस्थितीत ग्रामसभा सुरू झाली. या सभेत ग्रामरोजगार सेवक पदाकरिता १४ इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर विचारविनीमय सुरू असताना गावातील काही समाजकंटकांनी आमच्याच मर्जितील उमेदवाराची निवड करा, अशी मागणी धरून ग्रामसभेत गोंधळ घालण्यात सुरुवात केली. तसेच खुर्च्यांनी सरपंच व महिला सदस्यांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याने या सभेत गोंधळ उधळून आला. याबाबद महिला सदस्यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात सोनु उपदेश रहांगडाले, राजकुमार राधाकिसन फटींग, विकास सोविंदा बावनकर, अनिल नामाजी फटींग, प्रमोद केशोराव चौधरी, रविंद्र जोंदरू वंजारी, खेमराज पतीराम फरकाराडे, रवी हरिचंद्र बावनकर, राधेश्याम रमेश बावनकर, महेंद्र वासुदेव बावनकर, पराग सेवदास फटींग याच्याविरोधात ग्रामपंचायत मालमत्तेचे सुमारे ५ ते ६ हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार केली. या तक्रारीवर तिरोडा पोलिसांतर्फे काय कार्यवाही करण्यात येते, याकडे गराडावासीयांचे लक्ष लागले आहे.