आ. बच्चू कडूंची गोसे धरणावर धडक

0
10

भंडारा,दि.२२ः- गोसेखुर्द धरणामुळे विस्थापित झालेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी बुधवारी गोसे धरणावरील राजीव टेकडीवर धडक दिली. पाथरी, सौंदड, सावरगाव, जामगाव, खापरी, सालेशहरी, सालेभट्टी, थुटानबोरी, चिचखेडा, नेरला, पांजरेवार, निमगाव, गाडेघाट, नवेगाव, जिवनापूर, जाख, खराडा आदी गावातील शेकडो प्रकल्पग्रस्त यावेळी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन राष्ट्रीय पुनर्वसन प्रकल्पाप्रमाणे व्हावे, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना जलाशयावर हक्क मिळावा, प्रकल्पग्रस्त व त्यांच्या पाल्यांना शिक्षण मोफत द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आ. बच्चू कडू यांच्या आगमनानंतर आंदोलनाला बळ आले. आ. बच्चू कडू यांनी यावेळी मार्गदर्शन केले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांपर्यंत शासनातर्फे कोणताही निरोप आला नव्हता. त्यामुळे उशिरापर्यंत आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.
यावेळी राजीव टेकडीवर प्रहार समिती भंडारा व नागपूर जिल्हातर्फे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. आम्ही रक्त देतो पण आमच्या हक्काच्या मागण्या मान्य करा, असा संदेश यातून देण्यात आला.