चैत्र नवरात्र महोत्सवासाठी सूर्यादेव मांडादेवी देवस्थान समिती सज्ज

0
27
ज्योतिकलश स्थापना, सर्वधर्म सामूहिक विवाहसोहळ्यासह विविध कार्यक्रम
गोरेगाव,दि.12 : पूर्व विदर्भातील प्रसिध्द देवस्थान सूर्यादेव मांडादेवी येथे दरवर्षी चैत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. उत्सव दरम्यान ज्योतिकलश स्थापना, रामचरित मानस महायज्ञ व सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा यासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. येत्या १८ मार्चपासून सुरू होणार्‍या चैत्र नवरात्र उत्सवासाठी देवस्थान समिती सज्ज झाली आहे. भाविकांच्या व्यवस्थेसह विविध कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत सर्व पदाधिकार्‍यांनी भाविकांच्या व्यवस्थेसाठी सर्वपरीने तत्परता दाखविली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गोरेगाव तालुक्यातील सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथे चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे, यासाठी पुर्व नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष भैय्यालाल सिंद्राम, सचिव विनोद अग्रवाल, कोषाध्यक्ष मुन्ना असाटी, सामूहिक विवाह समितीचे अध्यक्ष सिताराम अग्रवाल, ज्योतिकलश समितीचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, सहसचिव कुसन घासले यांच्यासह समितीचे पदाधिकारी गणपतलाल अग्रवाल, डॉ.जितेंद्र मेंढे, नंदकिशोर गौतम, हुकूमचंद अग्रवाल, पोषण मडावी, योगराज धुर्वे, सखाराम सिंद्राम, शालिकराम ऊईके, रामदास ब्राम्हणकर, शिवराज सराटे आदि उपस्थित होते.
बैठकीत १८ मार्चपासून सुरू होणार्‍या चैत्र नवरात्रोत्सवाच्या तयारीसाठी चर्चा करण्यात आली. नवरात्रोत्सव दरम्यान १८ मार्चपासून ज्योतिकलश स्थापना करण्यात येणार आहे. तर २५ मार्च रोजी कलश विसर्जन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २५ मार्च रोजी सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या उत्सवदरम्यान देवस्थानात हजेरी लावणार्‍या भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी सर्वपरीने उपाययोजना व समितीच्या सदस्यांनी सतत सज्ज रहावे, असे निर्देश देण्यात आले. उल्लेखनिय असे की, देवस्थान समितीच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाचे आदर्श अख्या महाराष्ट्रात या समितीचेच मानले जात आहे. त्याचप्रमाणे उत्सव दरम्यान देवस्थान परिसराला यात्रेचे स्वरूप येत असते. लाखोच्या संख्येत भाविक उत्सवदरम्यान हजेरी लावत असतात. अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव विनोद अग्रवाल यांनी दिली आहे.