‘एफडीसीएम’विरोधात जंगलात उपोषण

0
8

गडचिरोली,दि.12ः- कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, वाढोणा, सावलखेडा, कराडी या गावातील ग्रामसभांनी एफडीसीएमच्या मार्फतीने केली जाणारी वृक्षतोड थांबवून तीन ट्रॅक्टर जप्त केले. १0 मार्चला शिरपूर ग्रामपंचायतीने वनविकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना चर्चेसाठी बोलाविले होते. मात्र ते आले नाही. या वृक्षतोडीच्या विरोधात १३ मार्च पासून ग्रामसभा जंगलातच उपोषण करणार असल्याची माहिती ग्रामसभांनी दिली.
पेसाअंतर्गत येणार्‍या गावातील जंगल परिक्षेत्रात वन संवर्धन १९८0 मध्ये काहीही अंतभरूत असले तरी केंद्र सरकार शाळा, दवाखाना, जलवाहिनी, लहान सिंचन कालवे, गौण जलाशये या सुविधांकरीता वनजमीन खुली करायची आहे. मात्र प्रतिहेक्टरी ७५ पेक्षा अधिक वृक्ष तोडता येत नाही. एफडीसीएमने मागील चार-पाच वर्षांपासून घनदाट जंगलाची कत्तल चालविली आहे. भगवानपूर, शिरपूर या जंगलात वन्यजीवांचा वावर असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (५३) अन्वये राज्य सरकारला देखील आपल्या अधिकाराचा वापर करून वन्यप्राण्यांवर प्रतिकूल परिणाम करणारी कृती करता येत नाही. परंतु एफडीसीएम वनाची आणि वन्यजीवांच्या निवार्‍याची हानी करीत आहे.
वनविकास महामंडळाने आपल्या बळाचा वापर करून कुरखेडा, आरमोरी, वडसा तालुक्यातील घनदाट जंगले नष्ट केली. जंगलातील झाडांची मशीन व्दारे कत्तल करून ती लाकडे वडसा, कुरखेडा मार्गावरील डेपोत जमा केली जातात. ज्या ठिकाणची जंगले नष्ट केली व मानवीकृत रोपे लावली ती झाडे निम्म्यापेक्षा नष्ट होत आहेत, असा आरोप ग्रामसभांनी केला आहे. ग्रामीण जनतेचा जंगलातील गौण खनिजावर उदरनिर्वाह चालतो. तेंदू, मोह, डिंक, बेहडा हे गौण वनोपज देखील एफडीसीएमने नष्ट केले आहे. याविरूध्द आता ग्रामसभा एकवटल्या असून ‘एफडीसीएम हटाव, जंगल बचाव’ चा नारा देत १३ मार्चपासून जंगलात उपोषणाला बसणार आहेत.