24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ २८ वर्षांत दोनदा ट्रान्सफार्मर लागले,पण गावात उजेड पडलाच नाही!

२८ वर्षांत दोनदा ट्रान्सफार्मर लागले,पण गावात उजेड पडलाच नाही!

0
37

गडचिरोली, दि.१६: जिल्ह्यातील एका अतिदुर्गम गावाला प्रकाशमान करण्याचे प्रयत्न महावितरण कंपनीने केले खरे; परंतु या गावात उजेड पडता पडता राहून गेला. एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील भूमकान गावाला मागील २८ वर्षांत उजेडाने दोनदा हुलकावणी दिली, त्या गावाची ही व्यथा.

एटापल्ली तालुक्यातील भूमकान हे गाव अतिदुर्गम. हा परिसर तसा नक्षलग्रस्तच. छत्तीसगडची सीमा अवघ्या दीड किलोमीटरवर. शासकीय कामाशिवाय या व परिसरातील गावांतील नागरिकांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तसा कमीच. बाजारहाट आणि अन्य दैनंदिन व्यवहारही बव्हंशी छत्तीसगडशीच होतो. मानेवारा गटग्रामपंचायतींतर्गत मानेवारा, भूमकान, गुडरम व तारका या गावांचा समावेश होतो. भूमकान गावात ७५ घरे असून, लोकसंख्या ५५० एवढी आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर या गावात वीज पोहचली नाही. त्यामुळे कंदिल आणि दिव्याच्या प्रकाशातच परिसरातील नागरिकांनी स्वातंत्र्यानंतरची ७० वर्षे काढली.

१९९० मध्ये तेव्हाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या डोक्यात उजेड पडला होता. मंडळाने त्या वर्षी भूमकान गावात ट्रान्सफार्मर लावले, खांब उभे केले आणि ताराही ताणल्या होत्या. मात्र, गावात उजेड पडला नाही. बरीच वर्षे लोक वाटच पाहत राहिले. पण, गाव प्रकाशमान झाले नाही. अखेर ट्रान्सफार्मर जिथल्या तिथे गंजले, काही खांब वाकले, काही तुटले आणि तारांची चोरी झाली. आता पुन्हा नव्या महावितरण कंपनीला जाग आली. या कंपनीने मागच्या वर्षी एप्रिल २०१७ मध्ये भूमकानमध्ये नवीन ट्रान्सफार्मर लावले, सिमेंटचे खांब उभे केले आणि ताराही लावल्या. हे सगळं करुन वर्ष पूर्ण होत आहे. परंतु गावात सरकारचा उजेड पडला नाही. वीज केव्हा सुरु करणार, अशी विचारणा करणारे पत्र ग्रामपंचायतीने दिवाळीपूर्वी कसनसूरच्या महावितरण कार्यालयाला दिले. त्याचे उत्तर अद्यापही मिळाले नाही. दिव्याच्या प्रकाशात वकिलीचे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणारे भूमकानचे तरणेबांड सरपंच कोतुराम पोटावी हे गावाच्या विकासासाठी धडपडताहेत. आमच्या आदिवासींना ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, हा त्यांचा प्रश्न आहे.