24.4 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ शहरात निघाली शोभायात्रा :‘जय झुलेलाल’चा गजर

शहरात निघाली शोभायात्रा :‘जय झुलेलाल’चा गजर

0
25

गोंदिया दि. १९ :: सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त येथील सिंधी समाजाकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अवघे सिंधीबांधव सहभागी झाल्याने ‘जय झुलेलाल’च्या गजराने गोंदिया नगरी दुमदुमून गेली होती.दरम्यान सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेच्या पाठोपाठ स्वच्छता अभियानही सिंधी समाजातील युवकांनी राबविले.
सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांचा जयंती दिवस सिंधी समाजबांधव मोठ्या धडाक्यात साजरा करतात. निमित्त शहरात सिंधी समाजाकडून शोभायात्रा काढली जाते. हजारोंच्या संख्येत सिंधीबांधवांच्या उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेतील आकर्षक झाकींनी मन मोहून घेतले होते. सिंधी कॉलनीतून ढोल ताशांच्या गजरात व नाचत गात निघालेली ही शोभायात्रा शहरातील गांधी प्रतिमा, सिव्हील लाईन्स व बाजार परिसर होत मुख्य मार्गाने गेली. शोभायात्रेत ‘आयो लाल झुलेलाल’चा गजर करीत सिंधीबांधवांनी एकमेकांना साई झुलेलाल यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.शहरात सिंधी समाजबांधवांची मोठी संख्या असून त्यांच्या आद्य दैवतांचा जयंती दिवस असल्याने शोभायात्रेत सहभागी बांधवांसाठी शहरातील चौकाचौकांत विविध खाद्यपदार्थांसह पेयांची व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या संख्येत सिंधी बांधवांसह अन्य बांधव या खाद्यपदार्थ व पेयांचा आस्वाद घेताना दिसले.

blank