गोंदिया-बल्लारशा ‘मेमो’च्या डब्ब्यांना आग

0
8

अर्जुनी मोरगाव,दि.05ः-काही दिवसापूर्वी मुंबई-हावडा मेलच्या इंजिनला लागलेल्या आगीची ताजी असतानाच गोंदिया येथून चंद्रपूरकडे जाणार्‍या मेमो रेल्वेगाडीच्या काही डब्ब्यांना बाराभाटी स्टेशनवर सोमवारी, ४ जून रोजी अचानक आग लागली. या आगीत कुठलीही जीवित हाणी झाली नसून, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.
सकाळी १0.१0 वाजता मेमो रेल्वेगाडी गोंदिया रेल्वेस्थानकावरून सुटली व दुपारी १२.३0 ला बाराभाटी रेल्वेस्थानकावर पोहोचली. रेल्वेगाडी थांबताच मागील डब्ब्याला अचानक आग लागली व पसरत पुढील काही डब्ब्यांपयर्ंत पोहोचली. त्यामुळे प्रवाशांनी डब्ब्याबाहेर धाव घेतली. दरम्यान रेल्वेप्रशासनाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. असा प्रकार या रेल्वे मार्गावर प्रथम घडल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती.
दरम्यान, घटनेसंदर्भात रेल्वे अधिकारी व कर्मचार्‍यांना विचारणा केली असता त्यांनी आग अचानकपणे लागल्याचे सांगितल्याने आग लागण्याचे कारण कळू शकले नाही. तर उष्णतेमुळे आग लागल्याची चर्चा अधिकारी, कर्मचारी व प्रवाशांमध्ये होती.