दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना शेतजमीन विक्रीसाठी अर्ज मागविले

0
20

गोंदिया,दि.१८ : अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या उत्पन्नाचे साधन वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा तसेच त्यांचे मजुरीवर असलेले अवलंबीत्व कमी होवून त्यांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना या घटकातील भूमीहिन शेतमजूरांसाठी राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहीन शेतमजूराला जमीन कसण्यासाठी ४ एकर जिरायती किंवा २ एकर बागायती जमीन १०० टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येते. ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येते.
जिल्ह्यात या योजनेकरीता ज्या शेतकऱ्यांना शासकीय दराने शेती विकायची आहे त्यांनी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय,गोंदिया यांच्याकडे त्वरित अर्ज सादर करावे. अर्जासोबत अर्जदाराचा विहीत नमून्यातील अर्ज, शेतजमीनीवर कोणताही बोजा नसल्याबाबत संबंधित तलाठ्याचे प्रमाणपत्र व सातबारा उतारा, संबंधित परिसरातील प्राथमिक, सहकारी कृषि पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, संबंधित परिसरातील कृषि पतपुरवठा करणाऱ्या बँकेचे कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, प्रस्तावित विक्रीच्या शेतजमीनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल, जिल्हा समितीपुढे सादर केलेल्या प्रस्तावातील शेतजमीन समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही याची शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यास जाणीव असल्याबाबतचे घोषणापत्र व जमीनीच्या खरीदी प्रक्रियेमुळे कोणतेही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत व सदर जमीनीबाबत कोणत्याही न्यायालयात वाद सुरु नसल्याबाबत व विक्री प्रस्तावातील जमीन कुठेही गहाण नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या जमीन मालकाचे शपथपत्र, जमीन विक्रीच्या अर्जावर शेतजमीन विक्री करणाऱ्या व्यक्तीशिवाय कुटूंबातील दोन व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या असाव्यात व त्यांचे विक्रीबाबत ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे.
ज्या शेतकऱ्यांना शासकीय दराने शेती विकावयाची आहे त्यांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया या कार्यालयाशी संपर्क साधावा व शेती विक्रीबाबत साध्या कागदावर अर्ज करावा. असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांनी केले आहे.