25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ दोन मुलांचा गणेश विसर्जन करताना बुडून मृत्यू

दोन मुलांचा गणेश विसर्जन करताना बुडून मृत्यू

0
27

यवतमाळ,दि.24ः- राळेगाव तालुक्यातील गोंडपुरा येथील घरगुती गणपतीचे कापसी येथील वर्धा नदी पात्रात विसर्जन करताना दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी (दि.24) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून, दुसर्‍याचा शोध सुरू आहे.

गोंडपुरा येथील दादाराव उईके यांच्या घरी बसविलेली गणेश मूर्ती शिरविण्यासाठी कापसी येथील वर्धा नदीवर नेली. तेथे नदीपात्रात मूर्ती शिरविताना दादाराव यांचा मुलगा हनुमान दादाराव उईके (वय 14 वर्षे) व गावातीलच रहिवासी संकेत तुमराम (वय 10) हे दोघेही वर्धा नदीच्या पात्रात बुडाले. त्यापैकी हनुमानचा मृतदेह सापडला असून, शवविच्छेदनासाठी राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. दरम्यान, संकेतच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. हनुमान हा दादाराव यांचा एकुलता एक मुलगा होता. नुकताच पाऊस झाल्याने व धरणाचे पाणी सोडल्याने सध्या वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. दरम्यान, या घटनेनंतर गोंडपुरा येथील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.