गोंदिया,दि.02- एक व दोन रुपयांची नाणी चलनबाद झाल्याबाबत भारत सरकार अथवा भारतीय रिर्जव्ह बॅकेने अधिकृतपणे घोषित केलेले नसल्याने ही नाणे स्वीकारण्यास मनाई करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी सूचना देत सदर नाणे चलनात स्वीकारण्यात यावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हात शहरी तसेच ग्रामीण भागातील दुकानदार,पेट्रोलपंपचालक,खासगी कर्जदेणार्या संस्थासह बँका व काही व्यक्ती व विशेष करून किराणा दुंकानादाराकडून एक व दोन रुपयांचे चलनी नाणे स्विकारण्यास टाळाटाळ केली जात आहे. काही बॅकाकडून देखील एक व दोन रुपयाचे चलनी नाणे स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच एक व दोन रुपयाचे चलनी नाणे व्यवहारातून बंद झाल्याबाबत खोटा प्रचार केला जात आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेस दैनंदिन व्यवहारात अडचणी येत असून संभ्रम निर्माण होणे ही बाब अतिशय गंभीर आहे. एक व दोन रुपयाचे चलनी नाणे बंद झाल्याबाबत भारत सरकार अथवा भारतीय रिर्जव्ह बँकेकडून अधिकृतपणे घोषित करण्यात आलेले नाही. चलनातील ही नाणी चलनात वापरण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे भारत सरकार व भारतीय रिर्जव्ह बँक यांनी अधिकृत केलेली सर्व प्रकारची चलनी नाणी सर्व प्रकारचे दुकानदार, सर्व प्रकारच्या बँका तसेच कोणत्याही व्यक्तीने व्यवहारात स्वीकारणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोणत्याही दुकानदार, बँक अधिकारी तसेच कोणत्याही व्यक्तीने भारत सरकार व भारतीय रिर्जव्ह बँकेने अधिकृत केलेले कोणत्याही प्रकारचे चलनी नाणे व्यवहारात स्विकारण्यास नकार दिल्यास अथवा टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यात सर्व दुकानदार, बँक व व्यक्तींनी एक व दोन रुपयांची नाणे व्यवहारात स्वीकारावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी केले आहे.





