आमदार काशीवारांनी घेतला पाणीटंचाईचा आढावा

0
7

लाखांदूर,दि.17ः- तालुक्यात पाणीटंचाईने भीषण स्वरुप घेतले असून दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा होत असून तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात भटकंती करावी लागत आहे. काही गावात अद्यापही पाणीपुरवठा योजना नाही. या संदर्भात साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळा काशिवार यांनी येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात आढावा सभा घेतली.
यावेळी नायब तहसीलदार विजय कावळे, गटविकास अधिकारी देविदास देवरे, सभापती मंगला बगमारे, उपसभापती शिवाजी देशकर, भाजपा तालुकाध्यक्ष नूतन कांबळे, भाजयुमो तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक हरीष बगमारे, जि. प. सदस्य मनोहर राऊत, पं. स. सदस्या नेहा बगमारे, अल्का मेर्शाम, कांता मेश्राम, ग्रा. पा. पु. कार्यकारी अभियंता मैदमवार, उप अभियंता मारबते, अभियंता निंर्बाते उपस्थित होते. यावेळी आमदार काशिवार यांनी तालुक्यात कार्यरत व बंद अवस्थेतील हातपंप, पाणी पुरवठा योजना, खाजगी विहीरी, विंधन विहीरींची माहिती उपस्थित सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून जाणून घेत पाणी टंचाई असलेल्या गावात हातपंप व पाणी पुरवठा योजना तयार करण्याचे संबंधित अधिकार्‍यांना निर्देश दिले.
सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी आपआपल्या गावातील पाणीटंचाईबाबतची समस्या सांगितली. तालुक्यातील ज्या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई आहे. त्या गावात तात्काळ पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आ. काशिवार यांनी दिले. तालुक्यातील गट ग्रामपंचायत विहीरगाव अंतर्गत येत असलेल्या आवळी, टेंभरी गावातील पाणीटंचाईची समस्या सरपंच होमराज ठाकरे यांनी सांगितल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी या गावात पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्यानंतर ग्रामस्थांची योजना पाहीजे नसल्याचे सांगितले. दरम्यान सरपंच ठाकरे यांनी असा काही प्रकारच झाला नसल्याचे सांगितले. त्यावर आमदार काशिवार यांनी अधिकार्‍यांना खडसावले.
सभेचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी देविदास देवरे यांनी केले. तर संचालन जि.बी.करंजेकर यांनी व आभार प्रमोद वानखेडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी हेमने, जनबंधु, मेर्शाम, उर्मिला निमजे, ज्योती बन्सोड, लोखंडे यांनी पर्शिम घेतले. यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.