24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : चंद्रिकापुरे

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : चंद्रिकापुरे

0
161

अर्जुनी मोरगाव,दि.05 : मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. शिक्षणाने संस्कार व मूल्यांची जडणघडण होते. माणसामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे. एकविसाव्या शतकातही आपल्या कायद्याचा बडगा उगारून शिक्षणाचे महत्त्व सांगावे लागते ही खरी शोकांतिका आहे. शिक्षणाचे खरे महत्त्व समाजात रुजलेच नाही, यासाठी समाजच कारणीभूत असल्याचे प्रतिपादन मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले. .

ते माहूरकुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित आदिवासी जनजागृती मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे होते. या मेळाव्याचे उद्घाटन जि.प. सदस्य गिरीश पालिवाल यांनी केले. यावेळी मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, बी.एस. सयाम, जि.प. सदस्य मंदा कुंभरे, चेतन उईके, कविता उईके, एस.आर. वाळवे, बाबुराव काटंगे, डॉ. नाजूक कुंभरे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे अनुसूचित जातीचे बांधव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श माणून शिक्षणाला महत्त्व देतात, त्याप्रमाणे आदिवासी बांधवांनी जननायक बिरसा मुंडा यांना आदर्श माणून शैक्षणिक क्रांती केली पाहिजे. शिक्षण असेल तर त्याचा कुठेही उपयोग करून घेता येतो. गरिबी वाट्याला येत नाही, आदिवासी बांधवांनी उच्च शिक्षण घेऊन भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा लाभ घ्यावा. आपल्या न्याय, हक्कासाठी लढा द्यावा व जीवन सुखकर करावे, असे मत व्यक्त केले. बी.एस.सयाम म्हणाले, जल, जंगल व जमिनीवर पूर्वीच्या काळी आदिवासींचीच सत्ता होती. हे ऐश्वर्य व आदिवासींचे हक्क अबाधित राखण्यासाठी बिरसा मुंडा यांनी लढा दिला. मात्र वर्तमानस्थितीत आदिवासींना जंगलातही राहता येत नाही व शहरातही वास्तव्य करता येत नाही, याप्रसंगी भागवत नाकाडे, गिरीश पालिवाल यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्याचे संचालन सुनीता कोकोडे यांनी केले. प्रास्ताविक विलास पंधरे यांनी केले तर आभार नेतराम मलगाम यांनी मानले. .