रुग्णांची सेवा हिच ईश्वर सेवा- पालकमंत्री बडोले

0
23

मोफत वैद्यकीय शिबीराचे उदघाटन
गोंदिया, दि.१५ : केशोरीचा परिसर मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. या भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम भगवती शिक्षण संस्था आणि संकल्प बहुउदेशिय संस्थेच्या फिरत्या आरोग्य पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. संस्थेच्या माध्यमातून रुग्णांची करण्यात येत असलेली सेवा हिच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
महिला आरोग्य अभियान पंधरवाडयानिमित्त राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत भगवती शिक्षण संस्था मेंढा व संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या फिरत्या वैद्यकीय पथकाच्या वतीने १४ मार्च रोजी अर्जुनी/मोरगांव तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा इळदा येथे आयोजित मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराचे उदघाटन पालकमंत्री बडोले यांनी केले .त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अर्थ व बांधकाम समिती सभापती प्रकाश गहाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून अर्जुनी /मोरगांव पंचायत समिती सभापती तानेश ताराम, उपसभापती पोमेश रामटेके, पंचायत समिती सदस्या कुंदा कुमरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नामदेवराव कापगते, इळदा सरपंच राजकुमार भोयर, रघुनाथ लांजेवार यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, वेगवेगळया प्रकारच्या आजाराचे प्रमाण मोठे आहे त्या तुलनेत तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. दुर्गम भागातील गरीब रुग्णाला दुर्धर आजार जर झाला तर त्याला आर्थिकदृष्टया उपचार करणे शक्य होत नाही. सेवाभावी वृत्तीने काम करणा-या संस्थेच्या डॉक्टरांनी भविष्यात या भागात विशेष रोगनिदान व उपचार शिबीर या भागातील जनतेसाठी घ्यावे.अपंगाची तपासणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हयात एक युनीट देण्यात येईल.
अपंगासाठी शिबीर घ्यावे त्यामुळे त्यांना दिलासा मिळण्यास मदत होईल असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, अपंगाची तपासणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हयात एक युनीट देण्यात येईल. प्रत्येक तालुक्यात आरोग्य विषयक कॅम्प घेऊन अपंगाना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रीया आणखी सुलभ करण्याचा प्रस्ताव शासनाला दिल्याचे सांगितले. इळदा येथे मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल. या भागात रस्ते व सिंचनाच्या सोई उपलब्ध करुन देण्यासोबतच वनावर आधारीत रोजगार निर्मिती करण्याचा प्रस्ताव सादर करावा त्याला आदिवासी उपयोजनेतंर्गत मंजूरी देण्यात येईल.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, अनुसूचित जातीतील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने प्रशिक्षण देण्यात येईल. शेतक-यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भविष्यात धानाला चांगला भाव देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन गहाणे म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून केशोरी परिसरातील ३० गावातील जनतेला संस्थेच्या फिरत्या पथकाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचे काम चांगल्या प्रकारे करण्यात येत आहे. या भागात काही तिर्थस्थळे आहेत त्यांना तिर्थस्थळांचा दर्जा मिळाला तर तेथे मुलभूत सुविधा उपलब्ध होऊन यात्रेकरुंची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.केशोरी येथील वैद्यकीय अधिका-याचे रिक्त असलेले एक पद त्वरीत भरण्यात यावे. अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना सभापती ताराम म्हणाले ,दुर्गम अशा भागात संस्था ही चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देत आहे. दुर्गम भागात काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांच्या कामाची दखल शासनाने घ्यावी. केशोरी येथे ग्रामीण रुग्णालय झाले पाहिजे त्यामुळे परिसरातील जनतेला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा मिळतील असेही ते म्हणाले.
यावेळी नेत्ररोग तज्ञ डॉ. पारधी, स्त्रीरोग तज्ञ डॉ.दुर्गाप्रसाद पटले, बालरोग तज्ञ डॉ.ढवळे, डॉ.गगन वर्मा,डॉ.तृप्ती पंचभाई, तसेच के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच सिकलसेल रुग्णांची तपासणी दादाजी कोढे यांच्या संस्थेच्या वतीने करण्यात आली. शिबीरात ४५७ रुग्णांची नोंदणी करुन तपासणी करण्यात आली. १८ रुग्णांची विविध प्रकारच्या शस्त्रक्रीयेसाठी निवड करण्यात आली. केशोरी, गोठणगांव व धाबेपवनी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या गावातील रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प संस्थेचे डॉ. राजेंद्र जैन,डॉ.अशोक चौरसिया, डॉ.सतीश जयस्वाल, बी.आर.पडोळे,भगवती शिक्षण संस्था मेंढाचे अध्यक्ष विठ्ठल मेश्राम व त्यांच्या सहका-यांनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र जैन यांनी केले .संचालन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय गुज्जनवार यांनी केले. आभार डॉ. पिंकू मंडल यांनी मानले.यावेळी परिसरातील नागरिक ,रुग्ण तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.