सिंचन प्रकल्पातील रखडलेली कामे पूर्ण करा :परिणय फुके

0
20

भंडारा,दि.02 : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतर्गत रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, अशी मागणी आ. डॉ.परिणय फुके यांनी अधिकाऱ्यांकडे केली.
गोसेखुर्द प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांची, शेतकऱ्यांची अनेक कामे रखडलेली आहेत. गावातील पुनर्वसन, नवीन सिंचन योजना अशा अनेक मागण्यांच्या संदर्भात शुक्रवारी सिंचन भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी भंडारा जिल्ह्यातील धारगाव उपसा सिंचन योजना टप्पा १ व टप्पा २, लोहारा पेवठा येथे नवीन उपसा सिंचन योजना तयार करणे, दवडीपार येथील ९८ घरांचे आंशिक पुनर्वसन, बेरोडी गावाचे पुनर्वसन, पिंडकेपार गावातील ७७ घरांचा मोबदला देणे, बोरगाव येथील २२ घरांचे पुनर्वसनाचे अनुदान मिळणे अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
चर्चेदरम्यान धारगाव उपसा सिंचन योजना टप्पा १ व टप्पा २ चा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, दवडीपार येथील आंशिक पुनर्वसनाचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून शासनाकडे सादर करून मंजूर करण्यात येईल, त्याचप्रमाणे पिंडकेपार येथील ७७ घरांच्या मोबदल्याबाबत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गी लावण्याचे आश्वासन महामंडळाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांनी दिले.या बैठकीत मुख्य अभियंता कांबळे, अधीक्षक अभियंता शेख, कार्यकारी अभियंता मेंढे, कार्यकारी अभियंता बुराडे, अवनीकर, भंडारा नगर परिषदेचे अध्यक्ष सुनील मेंढे, अनिल मेंढे, बबलू आतिलकर, पटले, विविध गावातील सरपंच व नागरिक सहभागी होते.