वाहतूक नियमांचे पालन करणे करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य-खासदार भावना गवळी

0
36

वाशिम, दि. ०5 :  रस्ते वाहतूक सुरक्षित व्हावी, तसेच अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक नियम बनविण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक वाहनधारकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्ष तथा खासदार भावना गवळी यांनी केले. ३० व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनानिमित्त आज उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री. लुंगे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बी. आर. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. गवळी म्हणाल्या, रस्ता सुरक्षा हा सर्वांसाठी महत्वाचा विषय आहे. त्यामुळे शासनानेरस्ता सुरक्षेसाठी अनेक नियम बनविले असून त्याची अंमलबजावणी प्रशासनामार्फत करण्यात येते. मात्र या नियमांविषयी वाहनधारकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याने रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जाते. प्रशासनाने या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षेच्या नियमांची माहिती द्यावी. विद्यार्थ्यांमध्ये आतापासूनच वाहतूक नियमांची जागृती झाली तर भविष्यात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण आपोआप वाढेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. खडसे म्हणाले, सध्या रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपला देश अपघातमुक्त होण्याचे स्वप्न आपण सर्वांनी पहिले पाहिजे, त्याकरिता वाहतूक नियमांचे पालन करून योगदान देण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे.श्री. राठोड यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात श्रीमती दुतोंडे म्हणाल्या, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यभरात आज रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन होत आहे. वाहनधारकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती करणे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. या सप्ताह कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये रस्ता सुरक्षेची शपथ दिली जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय परिसरात हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून विना हेल्मेट दुचाकीस्वाराला पाचशे रुपये दंड तर भरावा लागेलच पण त्याचे दोन तासांचे समुपदेशन केले जाणार आहे. रस्ता सुरक्षेविषयी विद्यार्थी व नागरिकांच्या संकल्पना जाणून घेण्यासाठी खुली चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या भिंतीपत्रिका, माहिती पुस्तिका व स्टिकर्सचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षेविषयी प्रश्नमंजुषा घेवून त्यामधील प्रथम तीन विजेत्यांना हेल्मेट भेट देण्यात आले. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाहंना रिफ्लेक्टरही लावण्यात आले, तसेच वाशिम-रिसोड मार्गावर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवून हेल्मेट वापराचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हरेश्वर पोतदार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मोटार वाहन निरीक्षक संजय पवार यांनी मानले.