एकोडीच्या सरपंच सचिवाची चौकशी करा

0
18

गोंदिया,दि.05: तालुक्यातील एकोडी ग्राम पंचायतीचे सरपंच विविध विकास कामे करताना नियमबाह्य व मनमर्जीने करुन ग्राम पंचायतीच्या मासीक सभेच्या विषय सुचित त्या मुद्यांचा उल्लेख न करता व सदस्यांना विश्वासात न घेता काम करीत असल्याने सदर प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांच्याकडे सदस्यांनी केली आहे. तक्रारदार सदस्यांमध्ये अजाबराव रिनायत, टेकलाल चौधरी, मंगला भदाडे व सविता राणे यांचा समावेश आहे. त्यातच ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंचाच्या नावाचे फलक हे बसस्थानकाशेजारील मुतारीजवळ फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने विद्यमान सरपंच व सचिवांच्या कार्यप्रणालीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तक्रारीत जे साहित्य १ लाखाच्यावरील असेल त्या साहित्याकरिता ई-निविदा काढणे बंधनकारक आहे. तसेच ई-निविदेची परवानगी मासीक सभेत घेणे ही अनिवार्य आहे. मात्र सरपंच या दोन्ही बाबी करतांना सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचे म्हटले आहे. मासीक सभेची नोटीस काढताना विषय सुची प्रमाणे सभा चालविणे अनिवार्य असताना सरपंच अशा प्रकारची कुठलीही कारवाई करीत नाही. मासीक सभेत जे ठराव घेण्यात येतात त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात येत नाही. तसेच प्रोसेडींगवर त्याची वेळीच नोंद न करता मनमर्जीने प्रोसेडींग लिहून बंद केले जाते. ग्राम पंचायत सदस्यांना दस्तावेज बघण्याचे अधिकार असताना सचिव दस्तावेज बघण्यास नकार देतात. १ कोटी ३४ लाख रुपयाचे पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली असून त्या योजनेची देखरेख ६ महिन्यापर्यंत कंत्राटदाराकडे असते. परंतु एकोडी ग्रा.््पं.चे सचिव व सरपंच असे न करता योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर सामान्य फंडातील निधी खर्च करतात. जेव्हा की सदर योजना ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झालेली नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करुन दोषी सरपंच, सचिवावर कारवाईची मागणी ग्राम पंचायत सदस्यांनी केली आहे.