वनांच्या संगोपनासाठी लोकसहभागाची गरज- सुधीर मुनगंटीवार

0
9

चंद्रपूर : ज्यादिवशी वनसृष्टी संपेल त्यादिवशी जीवसृष्टी राहणार नाही. यासाठी वनाचे महत्व ओळखून त्यांचे संगोपन करण्यासाठी लोकांच्या पुढाकाराची गरज आहे. शासन जंगल वाढविण्यासाठी मोठा निधी देऊन उपक्रम राबवित आहे. त्यात लोकांचा सहभाग असल्यास उत्तम प्रकारचे संगोपन, संवर्धन होऊन ओसाड जंगलाचे रुपांतर घनदाट आणि हिरव्यागार जंगलात होऊ शकते, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जागतिक वनदिनानिमित्त राजुरा वनपरिक्षेत्रातील वनउद्यानामधील निसर्ग निर्वचन केंद्राच्या लोर्कापणप्रसंगी श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार ॲड.संजय धोटे, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, वाहतूक व विपणन विभाग बल्लारपूरचे वनसंरक्षक अशोक खडसे, मध्यचांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती कापनगावचे अध्यक्ष रामचंद्र शिवणकर, सहायक वनसंरक्षक धोतरे व वनपरिक्षेत्राधिकारी सुनील हजारे आदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, यावर्षी अर्थसंकल्पात वनविभागाच्या विकासासाठी व जंगलाचे संवर्धन तसेच वातावरणातील बदल याची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. जंगल अस्तित्वात असेल तर मानवाचे विचार, आचार व आरोग्य प्रफुल्लित राहू शकते. त्यासाठी विकास व जंगलाचे संवर्धन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कार्य करण्याची गरज आहे.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी वन ॲकॅडमी, विसापूर येथे बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन केंद्र, वनउपज व वनऔषधी निर्मितीसाठी फेडरेशनची निर्मिती करण्यात आल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.