ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासावी-डॉ.हरिश्चंद्र बोरकर

0
8

गोंदिया ग्रंथोत्सव-२०१५ चे उदघाटन
गोंदिया, दि.२३ : कादंबरी, आत्मकथा, कथा-कथन, महापुरुषांचे चरित्र आदि पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. ‍पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरु आहेत. ग्रंथोत्सवात येणाऱ्या ग्रंथांच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासावी. असे मत झाडीबोलीचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा शासकीय ग्रंथालय आणि श्री शारदा वाचनालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सांस्कृतिक सभागृहात आज (ता.२३) गोंदिया ग्रंथोत्सव-२०१५ चे उदघाटन डॉ.बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, कवयित्री अंजनाबाई खुणे, शारदा वाचनालयाचे सचिव जगदिश मिश्रा, ग्रंथपाल शिव शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.बोरकर पुढे म्हणाले, जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करणे हा एक स्तुत्य उपक्रम आहे. ग्रंथ व पुस्तके वाचनाच्या सवयीमुळे माणसाची स्वत:ची ओळख निर्माण होते. आजही वाचक वर्ग आहे म्हणून साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे. विज्ञानाने जे दिले आहे त्याचा सदुपयोग करुन घ्यावा. आपल्या आयुष्याचा महत्वाचा वेळ वाया घालवू नये. प्रत्येकाने नेहमी कामकाजाशी निगडीत राहावे. आज लेखकांची संख्या निश्चितच वाढली आहे. परंतू असे लिहा की, ज्याला मूल्य आहे. पुस्तकांचे जतन केले पाहिजे. ग्रंथांच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढवा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना श्री.राव म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला एकाच ठिकाणी सर्वप्रकारची पुस्तके पहायला मिळतात. ग्रंथांचे जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. ग्रंथ व पुस्तके वाचनामुळे व्यक्तीची विचारशक्ती वाढते. आजच्या परिस्थितीत वाचन ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने वाचनाची सवय लावली पाहिजे. ग्रंथांचे महत्व जनतेला माहित झाले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अंजनाबाई खुणे म्हणाल्या, जेवढे वाचन कराल तेवढे आपले ज्ञान वाढेल. कुंभार जसा मडकी घडवितो तसे आपण आपल्या मुलांना संस्कार दयावे, त्यांना घडवावे. ‘मनुवांची संततीङ्क ही पुस्तक स्वत: लिहिली आहे त्या पुस्तकाचे सर्वांनी स्वागत करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी गोंदिया ग्रंथोत्सव-२०१५ चे आयोजनाबाबत सविस्तर माहिती विशद केली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त वाचनाची गोडी निर्माण व्हावी. वाचन चळवळ अधिकाधिक मजबूत झाली पाहिजे हा यामागचा उद्देश आहे. या गोंदिया ग्रंस्थोत्सवाला भेट देवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुस्तके विकत घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शहिद भगतसिंग यांच्या स्मृती दिनानिमीत्त व ग्रंथालयाचे जनक डॉ.एस.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलीत करण्यात आले. तसेच ग्रंथोत्सवात लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉलचे फित कापून मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन माहिती सहायक पल्लवी धारव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी मानले. यावेळी वाचकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.