खासगी बसेसविरुध्द काळीपिवळीचालकांचा रोष

0
17

गोंदिया,दि.16-रायपूर मार्गावर परवानानुसार वाहतूक करीत असलेल्या ट्रॅव्हल्स बसच्या विरोधात गोंदिया जिल्हा काळीपिवळी परमीट टॅक्सी मालक, चालक असोसिएशन व ऑटोरिक्शा चालक-मालक संघटनेच्या वतीने एल्गार पुकारून मार्गावर चालणार्‍या तीन बसेस पकडून वाहतूक नियंत्रण शाखेत शुक्रवारला जमा करुन सदर वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.जेव्हापासून या मार्गावर बसेस सुरु करण्यात आल्या तेव्हापासून काळीपिवळी व आटोचालकांच्या व्यवसायावर परिणाम पडू लागल्याने हे आंदोलन करण्यात आले.त्यातच पकडलेल्या बसचे नंबर चुकीचे असून चुकीचे क्रमांकाने वाहन चालवित असल्याचा आरोप करण्यात आला.याप्रकरणानंतर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सदर तीन्ही बसेसचे कागदपत्र तपासल्यावर ती योग्य असल्याचे लक्षात आले.फक्त एका बसवर लिहिण्यात आलेल्या क्रमांकात चूक असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर दोन बसेस सोडून चुकीचे क्रमांक लिहण्यात आलेली बस थांबविण्यात आली असून सदर बसवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, ट्रॅव्हल्स बसेसला राज्यात वाहतूक करण्याची परवानगी नसून इतर राज्यात जात असल्यास तसा परवाना शासनाकडून देण्यात येते. त्यानुसार छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे वाहतूक करण्यासाठी गोंदिया-रायपूर अशा पाच ट्रॅव्हल्स बसेला परवानगी देण्यात आली आहे. तर नियमानुसार सदर ट्रॅव्हल्स बस रायपूरला जाणे अनिवार्य आहे. तर दिलेल्या वेळेनुसार एक बस एका दिवशी एकदाच वाहतूक करू शकते. असे असताना संबंधित ट्रॅव्हल्स चालक-मालकाकडून नियमानुसार बस चालविण्यात येत नसून सदर बस देवरीपयर्ंतच चालविली जाते. त्यामुळे दिलेली वेळ व ठरविण्यात आलेले नियमांची पायमल्ली ट्रॅव्हल्स मालक-चालकांकडून करण्यात येत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून त्यांच्यावर कसलीच कारवाई केली जात नाही. उलट काळीपिवळी व ऑटोची परमिट असताना त्यांना नियमांचा धाक दाखवून विविध प्रकारचे चालान देवून वसूली केली जाते. तेव्हा सर्वांना नियम सारखाच ठेवून संबंधित ट्रॅव्हल्स मालक-चालकावर कारवाई करावी व सदर टॅ्रव्हल्स ठरवून दिलेल्या वेळेवर व गंतव्यापयर्ंत चालवावी अशी मागणी करत गोंदिया जिल्हा काळीपिवळी परमीट टॅक्सी मालक, चालक असोसिएशन व ऑटोरिक्शा चालक-मालक संघटनेच्या वतीने शहरातील वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक देवून जोपयर्ंत नियमबाह्य सुरु असलेली ट्रॅव्हल्सची वाहतूक बंद होणार नाही तोपयर्ंत काळीपिवळी व ऑटो सुरु होणार नाही. असा पवित्रा घेत एकच गर्दी केली. त्यामुळे परिसरा काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नियमबाह्यरित्या चालत असलेल्या एमएच १२, केक्यू 0३९१, एमएच ३५ ए एच ४९४९ व एमएच ३५ एजे 0१४९ या तीन ट्रॅव्हल्स बसेस वाहतूक नियंत्रण शाखेत जमा करून संघटनेच्या शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांची भेट घेवून त्यांना गोंदिया ते राजनांदगाव पयर्ंतचे परमीट असताना गोंदिया ते देवरी दरम्यान प्रवासी वाहतूक सुरु असून ते बंद करण्यात यावे. स्टॉपेज नसताना गावखेड्यातील प्रवासी भरणे बंद करण्यात यावे. एसटी बस थांब्यावरुन बुकींग बंद करण्यात यावी, आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी हेमराज मुनेश्‍वर, काळीपिवळी परमीट टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश शुक्ला, ऑटोरिक्शा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष सतिश समुद्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी चौकशी करून सबंधितांवर निश्‍चितच कारवाई करणार असल्याचे आश्‍वासन दिले.