बीएलओ संघटनेचे मानधनकरीता एसडीओंना निवेदन

0
8

गोंदिया,दि.24ः-मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची महत्वाची भूमिका राहत असून मतदार व मतदान यामधील महत्वाचा दुवा म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात येते. असे असले तरी त्यांना निवडणूक भत्ता देण्यात प्रशासनाकडून नेहमीच हलगर्जीपणा करण्यात येत असल्याचे दिसून येते. असाच प्रकार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीदरम्यानही घडून आल्याचे चित्र असून या बीएलओंना निवडणूक भत्ता देण्यात आला नसून निवडणूक भत्ता ताबडोतोब मिळावा यासाठी बीएलओ संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांना वर्षभर कार्य करावे लागते. निवडणुकीच्या वेळी मतदारांना मतदार स्लीपचे वाटप करने व बुथवर दिवसभर मतदान संपेपयर्ंत उपस्थित राहून कार्य करावे लागते. निवडणुकीपुर्वी घेण्यात आलेल्या बीएलओच्या बैठकीत गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर व जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवडणुकीच्या वेळी अन्य अधिकारी वर्गाप्रमाणेच बीएलओंना सुध्दा निवडणुकीचा भत्ता देण्यात यावे. अशी विनंती करण्यात आली होती. यावेळी त्यांना सर्व बीएलओंना निवडणुकीच्या दिवशी बुथवर भत्ता देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.
दरम्यान, ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र, बीएलओना निवडणूकीचा भत्ता देण्यातच आला नाही. त्यामुळे बीएलओंना निवडणूक भत्ता तातडीने देण्यात यावे, या मागणीचे निवेदन २२ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी वालस्कर यांना सादर करण्यात आले. यावेळी वालस्कर हे अनुपस्थित असल्याने निवडणूक विभागाचे लिपीक दिलीप कटरे यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी अध्यक्ष प्रविण कोचे, सचिव एस. एस. ठाकूर, उपाध्यक्ष माधुरी खोब्रागडे, उपाध्यक्ष चंदा ऊके, सहसचिव कल्पना पटले, कोषाध्यक्ष पन्नालाल रहांगडाले, संघटक दिनेश पटले, संघटक लक्ष्मीकांत कोल्हे, शिल्पा राऊत, दिपीका मेर्शाम, कविता पारधी, चांदनी मेश्राम, अश्‍विनी कावळे, इंदूमती रहांगडाले, सुनिता रहमतकर, आशा मस्करे, आशा शिवणकर, मिना वासनीक आदी बीएलओ उपस्थित होते