जलाशयाखालील हॉट मिक्स प्लांट तात्काळ बंद करा

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोरगाव,दि.07ः-तालुक्यातील सुपरिचीत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सिरंगाव बांध जलाशयाखाली मौजा सोमलपूर-गंगेझरी येथील गट क्र. १0६ लागून सिरेगावबांध तलावाजवळ नव्यानेच सुरू करण्यात आलेला हॉट मीक्स प्लांट स्वच्छ सुंदर पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी तो प्लांट त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी नवेगावबांध क्षेत्राचे जि.प. सदस्य तथा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, ईटियाडोह सिंचन प्रकल्प या पर्यटन स्थळासोबत सिरेगाव बांध जलाशय सुद्धा निसर्गाच्या सानी ध्यात आहे. हा जलाशय जैवविविधतेने नटलेला आहे. नेमक्या जलाशयाच्या खालीच सदर हॉट मिक्स प्लांटची निर्मिती करण्यात आली आहे. सदर जलाशयाच्या खाली आंब्याची मोठी आमराई सुद्धा आहे. सदर परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात विदेशी पक्षी सुद्धा येत असतात. प्लांटला लागूनच घनदाट जंगल असल्याने विविध वन्य प्राण्यांचेही वात्सल्य ईथे असते. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी सदर सिरेगाव बांध जलाशय असल्याने हे ठिकाण पर्यटन ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. अशा निसर्गरम्य ठिकाणी हॉटमीक्स प्लांट लागल्याने, प्लांटमधून निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण यामुळे सदर परिसरातील तलावात वास्तव्य करणारे विदेशी पक्षी व परिसरातील वन्यप्राणी यांच्या दैनंदिन वास्तव्यामध्ये अडथळा निर्माण होवून सदर परिसरातील नैसर्गीक जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच प्रमाणे पूर्वजांनी लागवट केलेली गावरान आंब्याचे झाडे नष्ट होण्याचे मार्गावर आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करून त्वरित नव्याने सुरू केलेला हॉटमीक्स प्लांट बंद करून इतरत्र हलविण्यात यावा, अशी मागणी किशोर तरोणे यांनी केली आहे.