चालकाच्या सतर्कतेने रेल्वे अपघात टळला

0
19
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर,दि.22 : इतवारी रेल्वेस्थानकावरुन नागभीडकरीता निघालेल्या पॅसेंजरच्या चालकाला शेतशिवारात आग लावल्याने जळालेले बाभळीचे झाड रेल्वेरुळावर पडल्याच दिसताच रेल्वे गाडी थांबविल्याने मोठा अपघात टळला.ही घटना दुपारी १ वाजताच्या सुमारास कारगाव शिवारात घडली. झाड रेल्वे रूळावर पडल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच ब्रेक लावत रेल्वे थांबविण्यात आली. अगदी झाडाच्या काही अंतरावरच रेल्वे थांबली. चालकाने वेळीच सतर्कता दाखविल्याने अपघात टळला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनाक्रमामुळे सदर रेल्वे सुमारे १५ मिनिटे उशिरा धावली. दिनेश येरणे असे चालकाचे तर एस. डी.चांदेकर असे गार्डचे नाव आहे.
पॅसेंजरमध्ये साधारणत: ७०० प्रवासी प्रवास करीत होते, अशी माहिती भिवापूर रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्तर प्रशांतकुमार यांनी दिली.दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ अंतर्गत नागपूर ते नागभीड आणि नागभीड ते नागपूर अशा दिवसभरात एकूण आठ फेऱ्या सदर पॅसेंजरच्या होतात. नागपूर इतवारी रेल्वेस्थानकावरून मंगळवारी सकाळी १०.४० ला ५८८४५ क्रमांकाची पॅसेंजर नागभीडच्या दिशेने निघाली. सदर रेल्वे उमरेड स्थानकावर दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी पोहचली. अशातच कारगाव शिवारात रेल्वे पोहचताच रेल्वे रुळावरच जळालेले काटेरी झाड पडले होते. चालक दिनेश येरणे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी प्रसंगावधान साधत अगदी अचूक क्षणाला रेल्वे थांबविली. अचानकपणे रेल्वे थांबल्याने प्रवासी भयभीत झाले होते. लागलीच झाड पडल्याची बाब लक्षात येताच काही प्रवाशांनी हे झाड बाजूला करण्यासाठी पुढाकार घेतला.