आसोली जि.प.गटाची निवडणूक २३ जून रोजी

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.27 : दीड वर्षापासून रिक्त असलेल्या गोंदिया तालुक्यातील आसोली जि.प.गटाच्या पोटनिवडणुकीचा मुहूर्त सापडला असून ही निवडणूक २३ जून रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे, रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील ९ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध १६ पंचायत समित्यांमधील १६ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २0१९ मतदान; तर २४ जून २0१९ रोजी मतमोजणी होणार आहे.
पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ३ ते ८ जून २0१९ या कालावधीत स्वीकारली जातील. ५ जून २0१९ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतदान २३ जून २0१९ रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या वेळेत होईल. तर गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या जागेसाठीही पोटनिवडणूक पार पडणार आहे. यामध्ये गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा यांचा समावेश आहे. पोटनिवडणुकीसाठी निवडणूक विभागाने कार्यक्रम जाहिर केला असून तो कार्यक्रम या प्रकारे आहे. नामनिर्देशनपत्रे सादर करणे-३ ते ८ जून, नामनिर्देशनपत्रांची छाननी- १0 जून, अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- १५ जून, अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- १९ जून व मतमोजणी २४ जूनला होणार आहे. विशेष म्हणजे जानेवारी २0१८ मध्ये आसोली जि.प.गटाचे सदस्य शेखर पटले यांचे निधन झाले होते. तेव्हापासून ही जागा रिक्त होती. त्यानंतर जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणूक पार पडली. तरीपण या निवडणुकीला मुहूर्त सापडला नव्हता, अखेर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जि.प.व पं.स.रिक्त पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.