क्षयरुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला देणे बंधनकारक

0
15

वाशिम, दि. 31 : केंद्र सरकारच्या १६ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व सार्वजनिक रुग्णालय व खाजगी रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे निदान झालेले, उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंद जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यापैकी एका स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याकडे करणे बंधनकारक आहे. क्षयरुग्णांची माहिती ‘निक्षय’ (https://nikshay.in) या संकेतस्थळावर व मोबाईल अॅप (nikshay app) वर नोंद करावी, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले आहे.

क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालयांना व वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (१८६० च्या ४५) च्या कलम २६९ आणि २७० च्या अंतर्गत शिक्षा होवू शकते. औषधी विक्रेत्यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ३० ऑगस्ट २०१३ च्या परिपत्रकानुसार क्षयरोगावरील औषधांच्या विक्रीची माहिती विहित नमुन्यात ठेवणे बंधनकारक आहे. याबाबत अधिक माहितीकरीता हेल्पलाईन क्रमांक १८००११६६६६ या क्रमांकावर संपर्क करावा  किंवा ‘निक्षय’ सॉफ्टवेरचा उपयोग करावा.

 ‘निक्षय’ पोषण योजनेतंर्गत क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण होईपर्यंत ५०० रुपये पोषण आहारासाठी आर्थिक मदत रुग्णाच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. क्षयरुग्णांची नोंद करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकास ५०० रुपये मानधन, क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण करुन घेतल्यास पुन्हा ५०० रुपये मानधन, क्षयरुग्णांचा उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उपचार सहाय्यकास ड्रग्स सेंसीटिव्ह क्षयरुग्णामागे १००० रुपये व एम.डी.आर रुग्णामागे ५००० हजार रुपये मानधन, रुग्णांना आवश्यक तपासणीसाठी ५०० रुपये मानधन इत्यादी सुविधा देण्यात येत आहेत.