दहेगाव शिवारात चितळाचा अपघाती मृत्यू

0
12

आमगाव,दि.13ः-गोंदिया-आमगाव मार्गावरील दहेगाव जंगल शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू झाला. ही घटना ११ जून रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर या मार्गावर अपघातात होणार्‍या वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा प्रश्न पुन्हा चिंतेचा ठरला आहे.
गोंदिया-आमगाव मार्गावर दहेगाव गावाजवळील जंगल विविध वन्यप्राण्यांसह चितळ व हरणाच्या अधिवासासाठी प्रसिध्द आहे. या प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे तसेच हे जंगल जंगलसफारीसह पर्यटनस्थळ व्हावे, यासाठी गत काही वर्षांपासून स्थानिक वन समितीच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याला जिल्ह्यातील नागरिकांचीही पसंती मिळाली आहे. परंतु, गत एक वर्षात या परिसरातील मार्गावर वाहनाच्या अपघातात पाच प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. ही बाब वन्यजीव प्रेमींसह वनविभागासाठी चिंतेची आहे. ११ जून रोजी वाहनाच्या धडकेत चितळाला जीव गमवावा लागल्याचे वन्यजीवप्रेमींकडून बोलले जात आहे. दरम्यान, आमगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी चन्ने, वन्यप्राणी समिती गोंदिया जिल्हा सदस्य रघुनाथ भुते, उत्तम नंदेश्‍वर, डी. आर. राठोड, भेलावे, केवट आदींच्या उपस्थितीत चितळावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, दहेगाव शिवारातील रस्त्याच्या दोन्ही बाजुला जंगल असून वन्यप्राणी हा रस्ता ओलांडत असताना अनेकदा वाहनांच्या धडकेत प्राण्यांचा मृत्यू अथवा जखमी होण्याची शक्यता नेहमीच राहते. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजुला जाळीचे कुंपन लावून रस्त्यावर ठराविक अंतरावर गतिरोधक लावण्याची गरज आहे. वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी हे उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी वन्यप्राणी समितीतर्फे लवकरच संबंधितांना निवेदन देण्यात येणार असल्याचे समितीचे सदस्या रघुनाथ भुते यांनी सांगितले.