संत्रा, लिंबू, डाळिंबासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना

0
34

वाशिम,दि.१3 :  जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा, डाळिंब व लिंबू या फळपिकासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मध्ये २०१९-२० राबविण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे. या योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी संत्रा व लिंबू फळपिकांसाठी १४ जून २०१९ व डाळिंब पिकासाठी १५ जुलै २०१९ पर्यंत नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

मृगबहार संत्रा फळपिकाकरीता वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डीआसरा व राजगाव, रिसोड तालुक्यातील रिसोड, केनवड, भरजहांगीर व रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस व मेडशी, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, शेलू खु., पोटी, कवठळ, धानोरा, शेलू बाजार व पार्डीताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली, उमरी बु. व कुपटा, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, कारंजा, कामरगाव, धनज बु. पोहा, खेर्डा बु., हिवरा लाहे व येवता या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

मृगबहार डाळिंब पिकासाठी वाशिम तालुक्यातील पार्डी आसरा, राजगाव व पार्डी टकमोर, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, आसेगाव, शेलूबाजार, कवठळ,धानोरा व पार्डीताड, मालेगाव तालुक्यातील मुंगळा, मानोरा तालुक्यातील उमरी बु. या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.लिंबू पिकासाठी वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यात संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी ७७ हजार रुपये असून शेतकऱ्यांनी केवळ ३ हजार ८५० रुपये विमा हप्ता भरावयाचा असून उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. तसेच जिल्ह्यात डाळिंब या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी १ लक्ष २१ हजार रुपये असून शेतकऱ्यांना केवळ ६ हजार ५० रुपये विमा हप्ता भरावा लागणार असून उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. लिंबू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ६६ हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता प्रतिहेक्टर ३३०० रुपये इतका आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना संत्रा व लिंबू पिकासाठी १४ जून २०१९ तर डाळिंब पिकासाठी १५ जुलै २०१९ पर्यंत विमा हप्ता भरून सहभागी होता येईल. विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी बँक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.