संविधानात्मक हक्क ओबीसींचा पहिला मान

0
15

चंद्रपूर,दि.०९,अखिल भारतीय ओबीसी महासंघ पुरस्कृत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चौथे महाअधिवेशन ७ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथील इनडोअर स्टेडियम, सरुर नगर येथे आयोजित करण्यात आले होते आहे. या निमित्ताने पूर्व विदर्भातून जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाज या महाअधिवेशनात सहभागी झाला आहे. यासाठी नियोजन आखण्यासाठी स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयाच्या श्रीलिला सभागृहात नियोजन बैठक नुकतीच पार पडली. यात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी संविधानात्मक हक्क ओबीसींचा पहिला मान असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी नियोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रत्येक तालुक्यातून किमान १०० प्रतिनिधींनी आपपल्या तालुक्याचे प्रतिनिधित्व महाअधिवेशनात करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी हैदराबाद येथे अधिवेशन घेण्याचे कारणही यावेळी स्पष्ट केले. दक्षिणेमधील ओबीसी समाज जागृत आहे. तो एकवटला आहे. दक्षिण भागातल्या ओबीसी बांधवांमुळे लढा तीव्र आहे. तेथील समाजबांधव अधिक जागृक आहे. ओबीसींना घटनात्मक दर्जा प्राप्त आहे. घटनेत ओबीसींसाठी ३४० हे पहिले कलम आहे. त्यामुळे संविधानात्मक हक्क मिळण्याचा ओबीसी समाजाचा पहिला मान आहे. जे लाभ एस. सी. व आदिवासी समाजाला मिळतात, ते सर्व लाभ ओबीसीला जनसंख्येच्या प्रमाणात मिळाले पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक नवृत्त उपप्राचार्य बबन राजूरकर यांनी तर संचालन प्रा. रवी वरारकर यांनी केले. आभार प्रा. विजय मालेकर यांनी मानले. बैठकीला सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, प्रा. नितीन कुकडे, प्रा. विजय मालेकर, अविनाश पाल, तुकाराम ठिकरे, प्रा. अशोक पोफळे, कुणाल चहारे आदी उपस्थित होते. याशिवाय चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यातील तालुक्यांमधून ओबीसी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.