महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

0
13

गोंदिया,दि.८ : विभागीय महसूल कर्मचारी संघटना विभाग नागपूरच्या नेतृत्त्वात गोंदिया जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.८) काळ्या फिती लावून आंदोलन केले. १७ जून रोजी उपायुक्त महसूल यांची भेट घेऊन संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याच अंतर्गत ८ जुलै रोजी गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील महसूल कर्मचाºयांनी आंदोलन केले.आंदोलनात महसुल कर्मचारी संघटनचे जिल्हा अध्यक्ष राजेश मेनन,सचिव आशिष रामटेके,कार्याध्यक्ष राकेश डोंगरे,सुपचंद लिल्हारे,महेश कांचनवार,विठ्ठल राठोड,अतुल कडू,मुकुंद तिवारी,पवन बिसेन,संजय सांगोडे,मोहसीन खान,एन.के.पराते,चैताली मानकर,सोनाली भोयर,रुपचंद नाकाडे,संतोष नान्हे,कांता साखरे,आर.बी.भाजीपाले,सुरेंंद्र भजनकर,नरेंद्र तिवारी यांचा समावेश होता.
नागपूर विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या संवर्गाची पदे परस्पर अदलाबदलीने भरण्यात यावीत, पुरवठ्यातील अव्वल कारकून पदावर महसूलच्या कनिष्ठ लिपीकांना किंवा पदोन्नती देण्यात यावी, नागपूर विभागातील महसूल कर्मचाºयांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, नागपूर विभागातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने विधानसभा निवडणुकीपुर्वी भरण्यात यावी, सरळ सेवा कोट्यातील नायब तहसीलदारांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, पदोन्नती झालेल्या नायब तहसीलदारांना नियमित पदाचा कारभार देण्यात यावा, सेवानिवृत्त होणाºया अधिकारी व कर्मचाºयांना मागविण्यात येणाºया नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करावी. या मागण्यांसाठी ८ जुुुलैला काळ्या फिती लावून काम केले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत निदर्शने केली. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.
सर्व कर्मचारी घेणार सामूहिक रजा
महसूल कर्मचारी आपल्या विविध मागण्या मान्य करवून घेण्यासाठी १० जुलै रोजी सामूहिक रजेचा अर्ज कार्यालयात सादर करुन निदर्शने करणार आहेत. ११ व १२ जुलै रोजी लेखनी बंद करुन निदर्शने करणार आहेत. तरीही मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.