आज पालकमंत्र्यांच्या हस्ते नविन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण,राजशिष्टाचाराला फाटा

0
42

गोंदिया,दि.३० : जयस्तंभ चौकातील तहसिल कार्यालयाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या नविन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री तथा आमदार राजकुमार बडोले हे असतील. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, खासदार प्रफुल पटेल व सुनिल मेंढे, आमदार सर्वश्री नागो गाणार, प्रा.अनिल सोले, गोपालदास अग्रवाल, संजय पुराम, विजय रहांगडाले, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या इमारतीच्या बांधकामावर ३१ कोटी ११ लाख ९ हजार रुपये खर्च करण्यात आला असून इमारतीतील विविध कार्यालयाच्या फर्निचरवर ८ कोटी ९४ लाख ९३ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. इमारतीतील प्रत्येक कार्यालयाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये वातानुकुलीत व्यवस्था, लिफ्टची सुविधा व कार्यालयाच्या मागणीनुसार आवश्यक ते फर्निचर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या इमारतीत एकूण ३२ कार्यालये स्थानांतरीत झाली आहेत.
या इमारतीमध्ये एक मोठी व एक लहान स्ट्राँग रुम, एक उपहारगृह, सेतू कार्यालय, पहिल्या माळ्यावर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, तहसिल कार्यालय व तहसिल कार्यालयाचा निवडणूक विभाग, तलाठी कार्यालय, नझुल तलाठी, अप्पर तहसिलदार यांचे कार्यालय, दुसऱ्या माळ्यावर जिल्हा माहिती अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, सहायक संचालक निधी लेखा परिक्षक, जिल्हा ग्राहक मंच, सह जिल्हा निबंधक, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, तिसऱ्या माळ्यावर कामगार आयुक्त, कामगार न्यायालय, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे उपकार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, गुप्त वार्ता विभाग, सहायक धर्मदाय आयुक्त यांचे कार्यालय तर चौथ्या माळ्यावर सहायक संचालक शासकीय अभियोक्ता, उपसा सिंचन विभाग गोंदिया, जिल्हा पणन कार्यालय, जिल्हा विशेष लेखा परिक्षक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सहनिबंधक पत संस्था व जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालय या इमारतीमध्ये असून एकाच इमारतीत ही सर्व कार्यालये आल्यामुळे कामानिमीत्त येणाऱ्या नागरिकांची आजपर्यंत झालेली गैरसोय आता कायमची संपणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

प्रोटोकालला फाटा

राजशिष्टाचारानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे.कुठलाही कार्यक्रमात त्यांना महत्वाचे स्थान असते परंतु या कार्यक्रमात राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्यांना प्रमुख अतिथीमध्ये ठेवण्यात आले तर आमदारांला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठेवण्यात आले.आमदाराला अध्यक्षस्थानी ठेवणे म्हणजे राज्यमंत्र्याच्या दर्जा असलेल्यांचा अवमान करणेच होय त्यांच्याएैवजी खासदार हे अध्यक्षस्थानी असते तर समजू शकले असते मात्र एका माजी मंत्री झालेल्यासाठी एवढा महसुल विभागाचा खटाटोप का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.