स्थानिक प्रश्नांवर काँग्रेस होणार आक्रमक : १९ रोजी चलो दिल्ली

0
7

नागपूर : वाढीव पाणी बिल, मालमत्ता करात झालेली वाढ, स्टार बसची दुरवस्था यासह विविध स्थानिक प्रश्नांबाबत शहर काँग्रेस आक्रमक भूमिका घेणार आहे. येत्या काळात या विषयांवर मोठय़ा प्रमाणात आंदोलने केली जाणार आहेत. शहर काँग्रेसने नगरसेवक, पदाधिकार्‍यांना तसा कार्यक्रम दिला आहे.
शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नगरसेवक, पदाधिकारी, पराभूत उमेदवार यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नासुप्रचे माजी विश्‍वस्त अनंतराव घारड, प्रफुल्ल गुडधे, अभिजित वंजारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके आदी उपस्थित होते. केंद्रीय भूसंपादन कायद्याविरोधात शहर काँग्रेसतर्फे १६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे दिले जाणार आहेत. या आंदोलनात काँग्रेस पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांसह सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सोबतच १९ एप्रिल रोजी दिल्ली येथे भूसंपादन कायद्याविरोधात आयोजित रॅलीतही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीत मुत्तेमवार व चतुर्वेदी यांनी कार्यकर्त्यांना निराश न होता जनतेचे प्रश्न घेऊन लढा देण्याचे आवाहन केले. काही नगरसेवक, पदाधिकारी पक्षाच्या तब्बल ३0 बैठकांना येत नाहीत, अशांवर यापुढे कारवाई करावी, अशी सूचनाही नेत्यांनी शहर अध्यक्षांना केली.
बैठकीला नगरसेवक दीपक कापसे, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, तानाजी वनवे, शीला मोहोड, सुरेश जग्यासी, संदेश सिंगलकर, बापू बरडे, राजेश कडू यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.