इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार – अर्थमंत्री ना.मुनगंटीवार

0
15

चंद्रपूर- मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी राज्य शासन निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. उर्जानगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. सिटीपीएसचे मुख्य अभियंता राजू बुरडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुख्य अभियंता प्रकल्प श्री.गोखले, उत्सव समितीचे कार्याध्यक्ष बबन माहूलिकर, सचिव शरद आडकीणे यांचेसह सिटीपीएसचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता स्थापन करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले या महामानवाने माणुसकीच्या महामार्गावर कसे जगावे हे समाजाला शिकविले. त्यांच्या विचारावर आधारीत समाज निर्माण करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बाबासाहेबाच्या विचाराने प्रभावित होऊन या वर्षीच्या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी केल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले.
इंदू मिलच्या जागेवर भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शासन उभारणार असून अर्थमंत्री या नात्याने या स्मारकासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. त्याचप्रमाणे कामठी (जि.नागपूर) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी १० कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी मोठया प्रमाणात यशस्वी व्हावे यासाठी मागासवर्गीय विद्याथ्र्यांच्या मुख्य परीक्षेचा खर्च राज्य शासन करणार असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वाचनालय उभारण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केल्याचे सांगून हे वाचनालय ३६ जिल्ह्याच्या ठिकाणी उभारले जाईल. डिजिटल ग्रंथालयासह सगळ्या सुविधा या वाचनालयात उपलब्ध असणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे माणुसकीचा संकल्प दिवस असून या महामानवाने दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा दिवस आहे. विषमतामुक्तीसाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यांनी दाखविलेल्या समतेच्या मार्गाने चालण्याचा निर्धार आजच्या दिवशी आपण करू या असे आवाहन त्यांनी केले.
राज्य घटना लिहीतांना डॉ.बाबासाहेबांनी सर्व धर्माचा व तत्त्वाचा विचार केल्याने घटना जगात अद्वितीय अशी झाली असल्याचे मत श्री.गोखले यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या अधिकारी-कर्मचा-यांचा पालकमंत्र्याचा हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.