दुर्गम व आदिवासी क्षेत्रातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देणार – पालकमंत्री डॉ. परिणय फुके

0
11

ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण
देवरी,दि. १९ : तालुक्यातील ककोडी हा भाग राज्याच्या सीमेवर असून हा भाग अतिदुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्या अतिसंदेनशील म्हणून ओळखल्या जातो. या भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
देवरी तालुक्यातील ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण दिनांक १९ ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी हया होत्या. विशेष अतिथी म्हणून आमदार संजय पुराम यांची तर जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ अकबर अली, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, जिल्हा परिषद सदस्य माधूरी कुंभरे, उषा शहारे, भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, प्रमोद संगडीवार, महेश जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. फुके म्हणाले, या दुर्गम व नक्षलग्रस्त भागात अधिकारी व कर्मचारी येण्यास तयार नसतात. ते या भागात सेवेत रुजू झाले पाहिजे यासाठी त्यांच्या सुरक्षेची काळजी निश्चितच शासन घेणार आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.या भागातील विविध समस्या आपण सोडविण्यास कटीबध्द आहोत. चिचगड येथे या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच अपर तहसिलदार कार्यालय सुरु होणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून देवरी तालुक्यात मोठया प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आल्यामुळे दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना वाहतुकीची व कामानिमित्त ये-जा करण्याची चांगली सुविधा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
देवरी तालुक्यातील दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागात आरोग्याच्या सुविधा आणखी बळकट करण्यासाठी बाईक ॲम्बूलन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा पोहोचविणार असल्याचे सांगून डॉ. फुके म्हणाले, या भागात मातामृत्यू, बालमृत्यू तसेच उपचाराअभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची दक्षता देखील घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांनी प्रारंभी कोनशिलेचे अनावरण करुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे फित कापून उद्घाटन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत असलेल्या विविध कक्षाला भेट देवून समाधान व्यक्त केले. या इमारतीच्या बांधकामावर २ कोटी १९ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. कार्यक्रमाला तहसिलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी श्री हिरुळकर यांचेसह आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ककोडी येथील ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. सुनील येरणे यांनी मानले.