सांसद आदर्श ग्राम योजनेत जैतपूरची निवड

0
12

भंडारा,दि.22ः-सांसद आदर्श ग्राम योजनेच्या यशस्वितेसाठी शासकीय इच्छाशक्ती बरोबरच लोकसहभाग देखील महत्त्वाचा आहे. आदर्श ग्राम निर्मितीत फक्त रस्ते, विज, पाणी अशा भौतिक सुखसोयी नसून गावातील तंटे, व्यसनाधीनतेपासून मुक्ती याद्वारे गावातील नागरिकांची मानसिक सुखशांतीसुद्धा तितकीच महत्त्वाची असल्याचे मत भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले.
सांसद आदर्श ग्राम योजनेतील पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या लाखांदूर तालुक्यातील जैतपुर गावास दिलेल्या प्रथम भेटी दरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी नरेश गीते, पंचायत समिती सभापती मंगला बगमारे, गावाचे सरपंच कृष्णराव थुरकर अन्य ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आगामी वर्षभरात गावामध्ये शाळा, ग्रामपंचायत सुशोभीकरण, गावातील तलावांची दुरुस्ती, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून दीर्घकाळ टिकणारे रस्त्यांची निर्मिती, प्रमुख चौकाचे सुशोभीकरण, ई विकासकामांचे नियोजन आहे. लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार येत्या २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून प्लास्टिक मुक्तीचे अभियान आपण राबविणार आहोत. सर्वांच्या सहभागाने जैतपूरला जिल्ह्यातील पहिले प्लास्टिक मुक्त गाव करायचे नियोजन केल्याची माहिती मेंढे यांनी दिली आहे.