साईबाबा जेलमध्ये उपोषणावर

0
9

नागपूर–माओवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या साईबाबांचे नागपूर मध्यवर्ती कारागृहात प्रचंड हाल होत आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असूनसुद्धा कारागृह प्रशासनातर्फे त्यांना योग्य ते उपचार दिले जात नाहीत. त्यामुळे अपंग साईबाबा कारागृहातच उपोषणाला बसले आहेत. साईबाबांचा छळ करून त्यांना मारून टाकण्याचा कारागृह प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत केला.

कोळसे पाटील म्हणाले, साईबाबा दोन्ही पायांनी अपंग असून त्यांचे हातही निकामी होत आहेत. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असून निमोनियासदृश परिस्थिती असल्याचे मेडिकलच्या अहवाल म्हटले आहे. विशेष जेलचे डॉक्टर साईबाबा यांची परिस्थिती चांगली असल्याचे सांगत आहे. त्यांच्या परिस्थितीवरून दोन डॉक्टरांमध्ये तफावत दिसून येत आहे. तब्येतीच्या कारणावर त्यांना जामीन मिळावा याकरिता हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. मात्र यासाठी वेळ लागणार आहे.

वेळीच त्यांच्यावर उपचार झाले नाही तर मृत्यू होऊ शकतो, अशी शंका पाटील यांनी व्यक्त केली. शनिवारपासून त्यांनी योग्य उपचार व जामीन मिळावा यासाठी उपोषण सुरू केले आहे. जेलमधून काही कैदी पसार झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. त्यांना बाहेरचे औषधही बंद केले आहे, असे पाटील यावेळी म्हणाले. लोकशाही हक्क संरक्षण समितीच्या शोमा सेन, अरविंद देशमुख यावेळी उपस्थित होते.