तिरोड्यात सोनोग्राफीची सोय-आ.विजय रहांगडाले

0
27

तिरोडा : येथील उपजिल्हा रूग्णालयात अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनची सेवा उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला केवळ १00 रूपयांत सोनोग्राफीचा लाभ मिळणार आहे. तर गरोदर महिला व बीपीएल कार्डधारकांना या सेवेचा नि:शुल्क लाभ मिळेल, असे प्रतिपादन तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी केले.
तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवार (दि.१४) सकाळी ११ वाजता अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन, कलर डॉपलर मशीन व टुडे इको मशीनचे लोकार्पण आ. रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
आ. रहांगडाले पुढे म्हणाले, समाजाच्या अंतिम घटकापर्यंत विकास कामांचा लाभ पोहचावा, असे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिले होते. त्याची व्याख्या आणि व्यवस्था भारतीय संविधानात करण्यात आली आहे. त्याच आधारावर स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण करताना आनंद होत आहे. याप्रसंगी निवळते स्थानांतरित जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनीसुद्धा धन्यवादाचे पात्र आहेत. त्यांच्या सहयोगामुळेच हे काम पूर्ण होवू शकले. त्यासाठी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांचे सहयोग व प्रयत्नसुद्धा उल्लेखनिय आहे. येणार्‍या पुढील दिवसात पाट खाटांचे अत्याधुनिक सुविधायुक्त आयसीयू खोल्यांचे निर्माण करून राजीव गांधी जीवनदायी योजनेपासून वंचित या क्षेत्रातील सर्व जनतेला लाभ मिळवून देण्याचा माझा संकल्प आहे. त्यासाठी त्यासाठी मी प्रयत्नशील असून सर्वांच्या सहकार्यानेच यश मिळू शकेल. तसेच नागरिकांच्या मागणीनुसार डिजिटल एक्स-रे मशीनच्या सेवेचे लाभ शासनाच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानी माजी आ. हरिश मोरे होते. अतिथी म्हणून माजी आ. भजनदास वैद्य, उमाशंकर हारोडे, संजयसिंह बैस, अनूप बोपचे, सलामभाई शेख, स्वानंद पारधी, राजेश मलघाटे, नितेश पंजवानी, डी.के. झरारिया, संजय खियानी, बालू समरित, प्रशांत भुते, भाजपचे अनेक पदाधिकारी व शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
माजी आ. भजनदास वैद्य यांची सर्वप्रथम सोनोग्राफी करून मशीन सुरू करण्यात आली. शेवटी सर्व रूग्णांना फळ व बिस्किटचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हा रूग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका व सर्व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.