‘जलयुक्त शिवार’अभियानाच्या जागृतीसाठी राज्यात जलदिंडीचे आयोजन

0
9

मुंबई : जलयुक्त शिवार अभियानाचा प्रचार व प्रसिद्धी व्हावी यासाठी शासनाच्या जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागामार्फत राज्याच्या विविध भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी (दि. 14 एप्रिल) जलदिंडी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

जनमानसात जलसाक्षरता, पाण्याचा ताळेबंद, पाण्याचे काटकसरीने नियोजन करणे यावर जलदिंडीच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे. यात मोबाईल व्हॅनद्वारे गावागावांना भेटी देऊन अभियानाबाबत १ एप्रिल ते ३१ मे २०१५ या कालावधीत जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रसिद्धी कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून म्हणजेच दि. १४ एप्रिल २०१५ पासून राज्यभरात करण्यात आला आहे.

राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ पाहता पाण्याचे नियोजन ही काळाची गरज आहे. यासाठी जलसंधारण विभाग व नरेगाअंतर्गत पाणलोट विकास कामे व जलसंवर्धनावर अधिकाधिक भर दिला जात आहे. ‘सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ करण्यासाठी व टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने नियोजनबद्धरित्या कृती आराखडा तयार करुन पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ राबविण्याचा शासन निर्णय ५ डिसेंबर २०१४ रोजी निर्गमित केला आहे. हे अभियान ५ वर्षांच्या कालावधीकरिता राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत दरवर्षी ५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात या वर्षासाठी सुमारे ५ हजार गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान ग्रामीण भागातील जनतेमध्ये पोहोचविण्यासाठी प्रचार, प्रसिद्धीच्या माध्यमातून व्यापक जाणीव जागृती करण्यासाठी रोजगार हमी योजना व जलसंधारण विभाग यांनी संयुक्तपणे जलदिंडीच्या माध्यमातून (मोबाईल व्हॅनद्वारे) प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.