घोटेकर, खंडेलवाल, भोयर मनपा झोन नवे सभापती

0
14

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या झोन सभापती पदासाठी बुधवारी मनपाच्या सभागृहात निवडणूक पार पडली. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीचे अंजली घोटेकर, अजय खंडेलवाल व सचिन भोयर विजयी झाले. आजपासून पुढील एक वर्ष त्यांचा कार्यकाळ असणार आहे.
चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराची हद्दही वाढत जाईल, हे गृहित धरून व नागरिकांना किरकोळ कामासाठी गांधी चौकातील मनपा कार्यालयात हेलपाट्या माराव्या लागू नये, यासाठी शहराचे तीन झोनमध्ये विभाजन करण्यात आले. झोन कार्यालयात जन्म-मृत्यू, कर, विविध दाखले आदी सर्व कामे होतील, अशी व्यवस्था या झोन कार्यालयात करण्यात आली आहे. या झोनचा कार्यभार सांभाळण्यासाठी झोन प्रमुखाचे पदही निर्माण करून अधिकार्‍यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या झोनचे प्रमुख पदाधिकारी झोन सभापती असतात.
यापूर्वी झोन क्रमांक १ मध्ये रवी गुरुनुले, झोन क्रमांक २ मध्ये विना खनके तर झोन क्रमांक ३ मध्ये विलास जोगेकर हे सभापतीपदी आरूढ होते. त्यांचा एक वर्षांचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे नवीन सभापती पदांसाठी आज निवडणूक घेण्यात आली. यासाठी महानगरपालिका कार्यालयाच्या सभागृहात एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता सभापतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल होते.
झोन क्रमांक १ च्या सभापती पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या अंजली घोटेकर व पुगलिया गटाचे सकिना अन्सारी रिंगणात होत्या. मतदान प्रक्रियेनंतर निकाल घोषित करण्यात आला. यात अंजली घोटेकर यांना १४ मते प्राप्त झाली तर सकिना अन्सारी यांना सहाच मतांवर समाधान मानावे लागले. अंजली घोटेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. झोन क्रमांक २ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीचे अजय खंडेलवाल तर पुगलिया गटाच्या विना खनके रिंगणात होत्या. विना खनके यांना सहाच मते मिळाली तर अजय खंडेलवाल १७ मते घेऊन विजयी झाले. झोन क्रमांक ३ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीचे सचिन भोयर तर पुगलिया गटाच्या सुनिता अग्रवाल रिंगणात होत्या. यात सचिन भोयर यांना विजयी घोषित करण्यात आले. ही निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती रामू तिवारी, उपायुक्त बारई, काँग्रेसचे गटनेते संतोष लहामगे, नगरसेवक धनंजय हुड, दुर्गेश कोडाम, अनिल रामटेके, एस्तर शिरवार, राजेश अड्डर, संदीप आवारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) अंजली घोटेकर अजय खंडेलवाल सचिन भोयर पराभव दिसताच माघार
झोन क्रमांक ३ च्या सभापती पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीचे सचिन भोयर आणि पुगलिया गटाच्या सुनिता अग्रवाल यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पुगलिया गटाचे केवळ राजेश रेवेल्लीवार हेच उपस्थित होते. पराभव स्पष्ट दिसताच सुनिता अग्रवाल यांनी आपले नामांकन परत घेतले. त्यामुळे सचिन भोयर हे अविरोध विजयी झाले.
१५ एप्रिल २0१६ पर्यंत कार्यकाळ
झोन क्रमांक १, झोन क्रमांक २ व झोन क्रमांक ३ मध्ये आजच्या निवडणुकीनंतर सभापतीपदाचा कार्यभार अनुक्रमे अंजली घोटेकर, अजय खंडेलवाल व सचिन भोयर यांनी स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ १५ एप्रिल २0१६ पर्यंत राहणार आहे.