27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गळचेपी कराल तर आत्महत्याही करू;अदानी विद्युत प्रकल्पासमोर कर्मचाऱ्यांचे सहकुटुंब आंदोलन

गळचेपी कराल तर आत्महत्याही करू;अदानी विद्युत प्रकल्पासमोर कर्मचाऱ्यांचे सहकुटुंब आंदोलन

0
32
गोंदिया ता. १५: तिरोडा येथील अदानी समुहाच्या अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड या विद्युत प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रोष प्रकल्पाविरोधात वाढतच आहे. येथे कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या निकाली निघाव्यात, कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्यात याव्यात, या मागणीला घेवून संघर्ष मजूर संघटना नावाचे संघटन उघडले. त्याची माहिती देखील विद्युत प्रकल्प प्रशासनाला देण्यात आली. कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. मात्र कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता १६ कर्मचाऱ्यांना चक्क कामावरून कमी करण्यात आले.  त्याकरिता एमबीई या कंपनीचे कंत्राट रद्द करून इतर सहा कंपन्यांना काम देण्यात आले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कर्मचारी घरी बसून आहेत. या अन्यायाला वाचा फोडून आपल्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेकरिता संघर्ष मजूर संघटनेतर्फ आज(ता. १५) अदानी विद्युत प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नोकरीतून काढण्यात आलेले कर्मचारी आपली पत्नी, मुलांसमवेत आंदोलनात सहभागी झाले होते. विद्युत प्रकल्प प्रशासन दडपशाही करत असून गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे. याविरोधात हा लढा सुरूच राहणार असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधीक तिव्र करून आत्महत्या देखील करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दिलीप मलेवार यांनी दिली. कर्मचाऱ्यांना १ ऑगस्ट पासून कायम करून मूळ वेतन देण्यात यावे, संघटन मान्य करण्यात यावे अशा मागण्या आंदोलकांच्या आहेत. यासंदर्भात अदानी विद्युत प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्यायालयीन प्रक्रीयेत आहेत. ज्या कंपन्यांचा कंत्राट संपला त्यांनी त्या १६ कर्मचाऱ्यांना १ ऑगस्ट पासून कामावरून कमी केले असल्याची माहिती दिली. हे प्रकरण अधीक चिघळणार असल्याचे आजच्या आंदोलनातून दिसून आले. विद्युत प्रकल्प प्रशासन यावर काय तोडगा काढतो की केवळ आश्वासनांवर कर्मचाऱ्यांची बोळवण करते, याकडे लक्ष लागले आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष दिलीप मलेवार, उपाध्यक्ष रविंद्र सिंगनजुडे, सचिव राजेश नेवारे, बालगोविंद डांबनउके, संतोष बिसेन, संजय बागडे, प्रवीण राऊत, निकेश पटले, कैलाश बालपांडे, रेखलाल परिहार आदींचा समावेश होता. परिस्थिती हाताबाहेर जावू नये याकरिता तिरोडा पोलिस ठाणे आणि गोंदिया पोलिस मुख्यालयातील सुमारे १०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी तहसीलदार वाकचौरे यांना निवेदन दिले.