भंडारा,दि.19ः-ग्रामस्तरावर निर्माण होणार्या प्लास्टिक कचर्याच्या व्यवस्थापनासाठी स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानातून प्लास्टिक मुक्त मोहीम लोकचळवळीच्या रूपाने राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे वतीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचार्यांसाठी स्वच्छता ही सेवा व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २0१९ कार्यक्रमाकरीता कार्यशाळा पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश बागडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) मनिषा कुरसंगे, समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, शिक्षणाधिकारी (प्राथ) पाच्छापूरे, जिल्हा कृषी अधिकारी डोंगरे, गट विकास अधिकारी खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप म्हणाले, स्वच्छता ही सेवा ही सगळीकडे पोहचली पाहिजे. या चळवळीच्या माध्यमातून स्वत:पासून चळवळ सुरू करून प्लास्टिक मुक्त कार्यालय, घर, वार्ड व गाव झाले पाहिजे. याकरिता स्वत: सामाजिक बांधिलकी जोपासून या चळवळीच्या माध्यमातून स्वच्छतेची सुरुवात करावी. स्वच्छता ही सेवेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात आपली मानसिकता बदलविण्यासाठी जनजागृती करायची आहे. त्याकरिता अधिकारी कर्मचार्यांना सामाजिक व्हावे लागेल, असे सांगितले.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी, स्वच्छता ही सेवा व स्वच्छ सर्वेक्षणासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेप्रसंगी अधिकारी व कर्मचार्यांशी संवाद साधला. त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण बाबत जिल्ह्यातील नागरिक, अधिकारी, कर्मचार्यांना आवाहन करून अभिप्राय नोंदविण्यासाठी सांगितले. स्वच्छतेसाठी आपले योगदान द्यायचे असेल आपण प्रतिक्रीया नोंदवावी ऐवढेच नव्हे तर मित्र मंडळी, नातेवाईक, कुटूंबातील सदस्य व शेजार्यांच्या प्रतिक्रीया नोंदविण्यासाठी पुढे यावे. स्वच्छतेच्या कार्यात प्रत्येकाचे सहकार्य लाभते आता मोहिमेत प्रत्येकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
विक्रमी मताने अभिप्राय नोंदवा
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २0१९ या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून मोबाईल अँपद्वारे स्वच्छतेसाठी ऑनलाईन अभिप्राय नोंदविण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीला एसएसजी २0१९ या अँपद्वारे आपला स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविता येतो. तसेच अँन्ड्राईड मोबाईल नसणार्या व्यक्तीला १८00५७२0११२ या टोल फ्री क्रमांकावर आपला अभिप्राय नोंदविता येईल. जिल्हयातील प्रत्येक घटकांनी आपला स्वच्छतेबाबतचा अभिप्राय भंडारा जिल्ह्याच्या सन्मानासाठी नोंदवून सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले. ग्राम पंचायत, शाळा, महाविद्यालय, विद्यालय, शासकीय कार्यालय, विविध ठिकाणी जिल्हाच्या चमू जावून स्वच्छ सर्वेक्षणाबाबत आवाहन करीत आहेत, त्यांच्या आवाहनाला प्रत्येक घटकांनी प्रतिसाद देवून अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन केले.




