30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी सुरू-शिल्पा सोनाले

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी सुरू-शिल्पा सोनाले

0
33

अर्जुनी मोरगाव,दि.19ः– आॅक्टोंबर महिन्यात होणार्या विधानसभा निवडणूका पादर्शकपणे तथा शांततेत पार पाडण्यासाठी  प्रशासन सज्ज असून आवश्यक त्या सर्व गोष्टींची पुर्तता तसेच मताधिकार केंद्रांबाबतची तपासणी करण्यात आल्याची माहिती ६३ अर्जुनी मोर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी पंचायत समिती अर्जुनी मोरच्या बचत भवनात (दि.१७) आयोजित पत्रपरिषदेत  दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विनोद मेश्राम, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील भानारकर उपस्थित होते. अर्जुनी मोरगाव,सडक अर्जुनी तथा गोरेगाव तालुक्यातील एका महसुली मंडळाचा समावेश असलेल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात एकूण ३१६ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

या मतदार संघात १ लाख २७ हजार ०५९ पुरूष मतदार तर १ लाख २५ हजार ४४१ महिला मतदार व एक तृतियपंथी असे एकूण २ लाख ५२ हजार ५०१ मतदार आहेत. आदर्श आचारसहिंता अंमलबजावणीसाठी भरारी पथके,स्थिरपथके, व्हिडिओ सर्वेक्षण पथके, स्थापन करण्यात आली असून त्याचे प्रशिक्षण सुद्धा पार पाडण्यात आले आहे. येणाèया विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पारदर्शकता व मतदारांना वेळोवेळी मतदानासाठी जागृत करण्यासाठी निवडणूक पाठशाला, मतदार यादीचे चावडी वाचन व नवमतदारांचे व दिव्यागांचे मतदान नोंदणीवर विशेष भर देण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी सांगीतले. मतदार यादीत नाव आहे किंवा नाही किंवा चुकीचे नाव तर नाही ना याची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. शाळा महाविद्यालयातही १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची नोंदणी मोहिम राबविली जात आहे.

येणाèया विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी जाताना वेगवेगळया अकरा प्रकारच्या ओळखपत्रापैकी निवडणूक आयोगाद्वारे प्राप्त मतदान ओळखपत्र मतदान केंद्रावर सोबत आणावे याबाबत मतदारांना आग्रहाने सांगण्यात येत आहे असेही शिल्पा सोनाले यांनी सांगीतले. विधानसभा निवडणूकीत उमेदवारांचे नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची तथा दिव्यांग मतदारांची नावे नोंदणी करता येतील त्यासाठी आपल्या गावातील बीएलओकडे अर्ज करण्याचे आव्हानही निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केली आहे. ६३ अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रांमध्ये महिलांना मतदाधिकारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सडक अर्जुनी तालुक्यात बुथ क्रमांक १३१ व अर्जुनी मोरगावातीव  बुथ क्रमांक २५१ मध्ये सखी बुथ स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यानी सांगितले.

दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून ज्या बुथवर दिव्यांग मतदार आहेत. तिथे मतदानकेंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी दिव्यांग राहणार असून बुथ क्रमांक २१३ बोंडगावदेवी येथे व बुथ क्रमांक २३४ अरततोंडी या बुथावर प्रत्येकी चौदा दिव्यांग मतदार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.विधानसभा क्षेत्रातील ३१ मतदान केंद्रावर थेट प्रक्षेपणाद्वारे निगरानी राहणार आहे. पारदर्शक मतदानासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक १९ ५० ठेवण्यात आला आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे ठिकाण व इतर निवडणुकीसंदर्भात कामे उपविभागीय कार्यालय येथे हे मुख्य कार्यालय ठेवण्यात आले असून ईव्हीएम मशीन ठेवण्याची व मतमोजणीचे ठिकाण बाजार समितीच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्याची माहितीही ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी दिली. येणाèया निवडणुकीत मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हानही त्यांनी केले आहे.